दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२२ । मुंबई । अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्काने गैरफायदा घेत नक्षली हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या साहित्यकृतीच्या पाठिंब्यासाठी उतरलेली पुरोगाम्यांची फौज राज्यातील सौहार्दाचे वातावरण नाहक बिघडवत आहे, असा स्पष्ट आरोप भाजपचे श्री. यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. या पुस्तकाच्या अनुवादास जाहीर झालेला पुरस्कार मागे घेऊन माओवादाविरोधातील भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहिल्याबद्दल त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले असून विकृत विचारांचा प्रसार रोखण्यासाठी जनता सरकारसोबत राहील असा विश्वासही व्यक्त केला आहे.
‘ फ्रॅक्चर्ड फ्रीडम ‘ या पुस्तकाच्या अनुवादित आवृत्तीला राज्य शासनाचा जाहीर झालेला पुरस्कार मागे घेण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतल्यामुळे बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी नेहमीप्रमाणे ”बौद्धिक वमन ” सुरु केले आहे. मुद्रित माध्यमे , समाज माध्यमे , दूरचित्रवाणी वाहिन्या अशा सर्व फांद्यांवरून एकसुरी मळमळ सुरू झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना नाकारून व कायदा हातात घेऊन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शेकडो जवान, विविध राज्यांच्या हजारो पोलीसांची हत्या करणाऱ्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या पुस्तकाला पुरस्कार देणे मान्य आहे का, याचा खुलासा या तथाकथित विचारवंतांनी करावा असे आव्हानही त्यांनी या पत्रकात दिले आहे. डॉ. आंबेडकरांनीही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध सनदशीर मार्गाने संघर्ष केला , त्यांनी हिंसाचाराचा किंचितही पुरस्कार केला नाही. राज्यघटना तयार करताना घटनेद्वारे स्थापित झालेल्या कायदा आणि न्यायव्यवस्थेतूनच सर्व प्रश्न सुटू शकतात , असा डॉ. आंबेडकरांना ठाम विश्वास होता. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये बळी पडलेल्या पोलिसांच्या हौतात्म्याबद्दल चकार शब्द न उच्चारणाऱ्या मंडळींना देशातील कायदा आणि न्याय व्यवस्थाच मंजूर नाही, असे दिसते. या पुस्तकाला पुरस्कार देणाऱ्या मंडळींनी राज्य सरकारशी कोणताही विचारविनिमय न करताच हा निर्णय जाहीर केला होता. ही चूक शिंदे – फडणवीस सरकारने वेळेत सुधारली, अशा शब्दांत श्री. —- यांनी सरकारच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
यापूर्वी जेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्तंभलेखन प्रवर्गातून डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स’* या ग्रंथाची निवड केली गेली, तेव्हा याच ढोंगी पुरोगाम्यांनी ‘हिंदुत्त्ववादी विचारधारेच्या लेखकाला पुरस्कार नको’, ‘साहित्य परिषद ही भटाळलेली आहे’ म्हणून रान पेटवले होते. आज राज्य शासनाने एक पुरस्कार परत घेतल्यानंतर जे पुरोगामी नौटंकी करत आहेत ते त्यावेळी शेवडे गुरुजींचा पुरस्कार रद्द करा म्हणून आकांडतांडव करत होते. पु. भा. भावे यांच्या अध्यक्षतेखालील पुण्याचे साहित्य संमेलनही याच वैचारिक दहशतवाद्यांनी उधळून लावले होते, याचे यांनी स्मरण करून दिले. पुरस्कार वापसीची नौटंकी करून साहित्यक्षेत्रात प्रदूषण माजविणाऱ्यांचा खरा चेहरा या निमित्ताने उघड झाला आहे, असेही ते म्हणाले.