सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीन ग्रामीण भागात रंगला चर्चेचा फड


दैनिक स्थैर्य । 6 जुलै 2025 । गिरवी । फलटण तालुक्यातील आगामी काळात होणार्‍या गावोगावच्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा शासकीय कार्यक्रम फलटण येथे होऊन गिरवी, निरगुडी, दुधेबावी, भाडळी खुर्द या गावांमध्ये सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत सरपंच पद सर्वसाधारण खुला वर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वसाधारण खुला गटातून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने राजकीय क्षेत्रात इच्छुक उमेदवारांनी आधीपासून सुरु केलेल्या राजकीय मोर्चेबांधणीला आता जोर वाढणार असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.

गिरवी, निरगुडी, दुधेबावी, भाडळी खुर्द गावात चावडीवर चौकातील कट्यावर पानटपरीवर चहाच्या टपरीवर गप्पांचा फड रंगला होता. महिला सर्वसाधारण सरपंच पदाच्या आरक्षण जाहीर झालेल्या सासकल, दरेवाडी गावात चुरस निर्माण होणार आहे.

गिरवी परिसरातील बोडकेवाडी व धुमाळवाडी येथे सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच पद आरक्षण जाहीर झाल्या मुळे अनेक इच्छुक उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे. विशेषत: बोडकेवाडी व धुमाळवाडी येथील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत सरपंच पदाच्या आरक्षणामुळे काही व्यक्तींना सरपंच पदाची लॉटरी लागणार, सरपंच पदाच्या उमेदवार शोधण्यासाठी राजकीय नेते मंडळींची शोधाशोध मोहिमेच्या कामाला सुरुवात झाली आहे.

चोदावा, पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना मिळत असलेल्या लोखों रुपयांच्या अनुदानाच्या योजना राबवण्यासाठी निधी उपलब्ध होत असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीत पुर्वी पेक्षा आता अधिक राजकीय रस्सीखेच स्पर्धा वाढू लागली आहे.

फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकीय दृष्ट्या सक्षम व प्रसिद्ध असलेल्या गिरवी, निरगुडी, दुधेबावी या गावातील सरपंच पदाच्या निवडणुकीत राजकीय क्षेत्रातील नेतृत्वाचा कस लागणार आहे. या राजकीय पाश्र्वभूमीवर गिरवी भागात सरपंच पदाच्या आरक्षण सोडती नंतर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

गावातील चावडी चौक, चहा टपरी, कट्टा यावर कोण कोण सरपंच पदाच्या शर्यतीत असणार व कोण जिंकू शकेल याविषयीची चर्चेचा फड रंगला आहे.


Back to top button
Don`t copy text!