शहीद ओंबळे यांच्या स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय यापूर्वीच!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । सातारा । 26/11 ला मुंबईवर हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेणार्‍या शस्त्रसज्ज अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडताना हौतात्म्य आलेल्या तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम आजही समस्त भारतीयांच्या हृदयात ठसून राहिला आहे. जावळीच्या या वीर सुपुत्राच्या केडंबे या मूळगावी उभारण्यात येणार्‍या भव्य स्मारकाचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लागावा, असे केडंबे ग्रामस्थांना व समस्त जावलीकरांना वाटते. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नियोजित स्मारकासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत झाला असतानाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत स्मारकासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणे, हे हस्यास्पद असून शहीद ओंबळे यांच्या अतुलनीय कामगिरीची अवहेलना करणारे आहे, असे मत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

हुतात्मा ओंबळे यांच्या पराक्रमामुळे जावली तालुक्यातील केडंबे हे छोटेशे गाव देशात प्रसिध्द झाले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमाची दखल घेवून राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी केडंबे येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. त्यांचे स्मारक झाल्यास केडंबे गावचे महत्त्व वाढून ओंबळे यांचे स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्मारक झाल्यास पर्यटनवृध्दीच्या दृष्टीने आश्‍वासक वातावरण निर्माण होवून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. यासाठी शहिद तुकाराम ओंबळे यांच्या भव्य स्मारकाबरोबरच केंडबे गावास अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा व गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जास्तीजास्त निधी देण्याची मागणी आपण वेळोवेळी शासनाकडे केली आहे.

केडंबे गावातील स्मारकासाठीच्या जमीन हस्तांतरणाच्या कामात वास्तविक जिल्हा प्रशासनाने पुढे होत कागदपत्रांची पूर्तता करून स्मारकाचे कामास गती देणे गरजेचे होते. मात्र निव्वळ दप्तरदिरंगाईमुळेच स्मारकाचे काम गेली अनेक वर्षे रखडले. स्मारकाच्या निधीसाठी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावाही केला असून यापूर्वी स्मारक निधीसंदर्भात झालेल्या शासनाच्या बैठकीत शहीद ओंबळे यांच्या स्मारकासाठी व केडंबे गावच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तथापि, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत स्मारकासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करणे, ही एकप्रकारे ओंबळे यांची अवहेलना करण्याचाच प्रकार असल्याचेही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!