स्थैर्य, बीजिंग, 03 : चीनच्या वुहानपासून जगभरात कोरोनाचा प्रसार झाला. दरम्यान, काही डॉक्टरांनी कोरोनाबाबत सरकारला माहिती दिली होती. मात्र आता याच डॉक्टरांच्या टीममध्ये असलेले डॉ. हू वेईफेंग यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. हू वेईफेंग हे कोरोनामुळं मृत्यू झालेले सहावे डॉक्टर आहेत. हू वेईफेंग चीनमधील वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये मूत्र-तज्ज्ञ म्हणून काम करत होते आणि कोरोनाबद्दल चेतावणी देणारे पहिले व्हिसलब्लोअर डॉक्टर ली वेनलियान्ग यांच्या टीमचा भाग होते. चीनी माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार हू वेईफेंग यांना गेल्या चार महिन्यांपासून संसर्ग होता. त्यांची प्रकृती ठीक असल्याची बातमी होती, मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
डॉक्टर हू वेईफेंग यांच्या निधनानंतर तेथील प्रशासनावर लोक टीका करत आहेत. जानेवारीमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळलं आणि कोरोनामुळे मृत्यू झालेले ते या रुग्णालयातील सहावे डॉक्टर आहेत. मागील वर्षी डिसेंबरमध्ये हू वेईफेंग ज्या रुग्णालयात कार्यरत होते, तेथेच कोरोनाबाबत सर्वप्रथम माहिती देणारे डॉ. ली वेनलियान्गही काम करत होते. कोरोनाविषयी इशारा दिल्यावर प्रशासनाने ली वेनलियान्ग यांना धमकी देण्यास सुरुवात केली. नंतर ली वेनलियान्ग यांनी रुग्णालयाच्या एका व्हिडीओद्वारे कोरोनाबाबतची माहिती जगसमोर आणली.
हू वेईफेंग यांच्या त्वचेचा रंग पडला काळा
42 वर्षीय डॉक्टर यी फेन आणि डॉक्टर हू वेईफेंग त्वचेचा रंग विलक्षण काळा झाला आहे. हे दोघेही वुहानच्या रूग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करत होते आणि तेथून दोघांनाही संसर्ग झाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दोघांना वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दोघांनाही सध्या लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले. मात्र हू वेईफेंग यांचा मृत्यू झाला तर यी फेन यांची प्रकृती ठिक असल्याचं कळत आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोनावरील उपचारादरम्यान या विषाणूमुळे डॉक्टरांच्या यकृताचे बरेच नुकसान झाले आहे. यकृताचा थेट परिणाम मानवी त्वचेचा रंग बदलताना दिसून येतो. चिनी माध्यमांनुसार, हू वेईफेंग यांचे एका महिन्यापेक्षा जास्त काळ आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर निधन झाले. कोरोना विषाणूने आजारी पडल्यानंतर त्याच्या शरीरातील इतर समस्याही वाढल्या. यापूर्वी वुहान सेंट्रल हॉस्पिटलमधील प्रवक्त्याने सांगितले की अॅंटिबायोटिक्सच्या वापरामुळं त्यांची त्वचा काळी झाली. माध्यमांमध्ये हू वेईफेंगचा एक फोटो समोर आला असून त्यात त्याच्या त्वचेचा बदललेला रंग दाखविण्यात आला होता.