
दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२२ । मुंबई । मोहनदास सुखटणकर यांच्या निधनाने निष्ठेने रंगभूमीची सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी गमावला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
दी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी दीर्घकाळ केलेली नाट्यसेवा महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील असेही श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. नाटकासह चित्रपटांमध्ये अभिनय करत त्यांनी सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यांच्या नाट्यप्रवासात दी गोवा हिंदू असोसिएशनला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत कलावंत म्हणून त्यांनी प्रवेश केला व नंतर कार्यकर्त्याच्या भूमिकेत ते वावरले. पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांनी नाट्यक्षेत्राची अव्याहतपणे सेवा केली आहे. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.