म्हसवड येथील माणगंगा नदीवरील माणदेशीने उभारलेल्या बंधाऱ्यातुन पडत असलेले पाणी
स्थैर्य, म्हसवड दि. २९ : कायम दुष्काळी असा माणच्या माथ्यावर असलेला शिक्का पुसण्यासाठी म्हसवड येथील माणदेशी फौंडशनने २०१२ सालापासुन सुरु केलेल्या लढ्याला आज यश आल्याचे दिसुन येत आहे, दुष्काळ निवारणासाठी व पाणीप्रश्न सोडवण्यासाठी माणदेशी फौंडेशनने तालुक्यात विविध ठिकाणी बांधलेले १७ बंधारे आज पहिल्याच पावसात खळखळुन वाहु लागल्याचे चित्र असुन हे ओसंडणारे पाणी पाहुन हा नक्की माण तालुकाच आहे का असा प्रश्न पडल्यावाचुन रहात नाही.
महाराष्ट्रामध्ये कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असणारा माण तालुका, माण चा भाग म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष, नेहमी दुष्काळ, दुष्काळ आणि दुष्काळच. या भागाला निसर्गाचीही साथ नाही. कुठलीच मुलगी लग्न करून माण ला यायला तयार होत नव्हती हे आजवरचे चित्र. दररोज सकाळी लवकर उठून पाण्यासाठी ४ ते ५ किलोमीटर पायपीट केल्यावर दोन हंडा पाणी मिळायचे शेतात कोणतही पिकं मिळत न्हवत, पिण्याच्या पाण्याचीच अवस्था अतिशय बिकट होती. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आतिशय गंभीर, अक्षरशा जनावरे विकायची वेळ आली होती. यावर येथील माणदेशी फौंडेशनने लढायची तयारी केली अन त्याप्रमाणे लढाईला सुरुवात केली माणदेशीच्या या लढाईला एच.एस.बी.सी. सारख्या परदेशी बँकांनी व शासनानेही साथ दिल्याने माणगंगा नदीवर व गरज असेल अशा ठिकाणी माणदेशी फौंडेशनने जवळपास १७ बंधारे उभारले, आज हे सर्व बंधारे पुर्णपणे भरुन खळखळुन वाहु लागल्याने माणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
माणदेशी ने २०११/२०१२ साली देशातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठी जवळपास १४ हजार जनावरांची चारा छावणी उभा करुन जवळपास दीड वर्ष हि छावणी चालू ठेवली होती. ५ हजार पेक्षा जास्त लोक याठिकाणी राहत होते. या दीड वर्षामध्ये जनावरांचा चाऱ्याचा,पाण्याचा प्रश्न माणदेशीने सोडवला. परंतु पुन्हा असा दुष्काळ नको म्हणत माण तालुक्यातील दुष्काळ हा कायम स्वरुपी हटवण्यासाठी माणदेशी संस्थेच्या संथापक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा (भाभी) यांनी या दुष्काळी भागातील भिषण चित्र उघड्या डोळ्यांनी पहिले आणि माणदेशातील दुःख दारिद्याचे निवारण करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले. माणदेशी फौंडेशन च्या माध्यामातून म्हसवड व म्हसवड परिसरातील वेगवेगळ्या गावात, वाड्या वस्तींवर कोट्यावधी रुपये खर्चून लाखो लिटर क्षमतेचे सिमेंट बंधारे बांधण्याचे ठरवले. आणि २०१२ पासून २०२० पर्यंत माणदेशीने लाखो लिटर क्षमतेचे १७ बंधारे बांधले. आज हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.
आज या १७ बंधार्यामध्ये ९२५ ( TCM ) एवढा पाणीसाठा आहे. यामुळे ५३७ विहरींना याचा फायदा झालेला आहे. जवळपास ६०० ते ६५० बोरवेल ला याचा फायदा झालेला आहे. १४२६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. जवळपास ३५५१ शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट लाभ झाला. आणि ३६ ,८०० लोकांना याचा इनडायरेक्ट लाभ झालेला आहे.
आज माणदेशी च्या या १७ बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारात हरितक्रांती झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. या शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा,शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. आज जे पाऊसाचे पाणी आलेले आहे,ते या बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवले जाते, जमिनीत मुरवले जाते. आज हे बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत.
परिणामी बाजरी, ज्वारी, मका, कांदा, मुग, व पालेभाज्या अशी पिकं शेतकरी आपल्या शेतातून आता घेत आहेत. या पिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न बळीराजाला मिळण्यास मदत झाली आहे. जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न सुटल्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूग्ध व्यवसायासाठी जर्शी, म्हशी, गाईंचे पालन केले जात आहे. त्याचबरोबर शेळीपालन हि केले जावु लागले आहे.
या सर्व ठिकाणी बंधाऱ्याची निगा राखण्यासाठी बंधारा पाणी समित्या हि स्थापन करण्यात आल्या आहेत. या भागात बंधारे बांधण्यासाठी सर्वात मोलाची मदत करणारे HSBC बँक, क्रेडीट स्विस, जनकल्याण चॅरीटेबल ट्रस्ट, आनंद प्रोजेक्ट , बृहद भारतीय समाज , SR हळबे , KBC व सर्व ग्रामस्त यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
आज या भागातला शेतकरी समाधानी असल्याने माणदेशी ने केलेल्या कामाचे देश, विदेशातही कौतुक होत आहे.
माणदेशीने उभारलेल्या १७ बंधाऱ्याचा लेखा – जोखा दर्शवणारा तक्ता