स्थैर्य, नाशिक, दि. 16 : दोन दिवसात एकाच वेळी जास्त पाऊस झाल्यामुळे गोदावरीच्या पात्रात पाणी साचते व सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी ते सखल भागात गेल्यामुळे सराफ बाजार परिसरात दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे, यावर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज दिली.
शहरातील सराफ बाजारात दोन दिवसांपासून झालेल्या मुसाळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री भुजबळ यांनी आज केली, त्यावेळी व्यावसायिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त, राधाकृष्ण गमे, मनपा विभागीय अधिकारी, जयश्री सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी, स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी प्रकाश थविल, पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी, नगरसेवक गजानन शेलार, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, 2008 साली सुद्धा अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली होती. अलीकडच्या काळात या भागात पावसामुळे नियमितपणे पाणी साठताना दिसते. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून, महापालिकेच्या सन्मवयातून तज्ञ अभियंते यांच्या सल्ल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री मंत्री भुजबळ यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना अजून संपलेला नाही
शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून त्यावर प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी स्वत: जागृत राहून काळजी घ्यावी. स्वत:च्या आरोग्याची सुरक्षा ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे शहरात बाजारपेठेच्या ठिकाणी गर्दी वाढत आहे. परंतु लॉकडाऊन जरी शिथिल झाला असला, तरी कोरोना अजुन संपलेला नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. अगदी गरज असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण फिरणे गर्दी करणे टाळावे, प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझर यांचा वापर कटाक्षाने करावा. तसेच पोलीस यंत्रणेने सुद्धा मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जरी असली तरी ती एक ठराविक संख्येपर्यंत वाढून नंतर हा वाढता आलेख आपोआपच खाली येईल, असा आशावादही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.