दैनिक स्थैर्य | दि. १७ मार्च २०२३ | फलटण |
धूळदेव (ता. फलटण) गावच्या हद्दीत अवैधरित्या कालवडींना ओमनी कारमधून नेताना मलटण येथील गोरक्षक अमोल जाधव यांनी ती कार अडविल्याने सुमारे १२ ते १३ जणांनी त्यास पिस्टल दाखवत लोखंडी गज, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात अमोल जाधव गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद शरद गाडे यांनी दिली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास धूळदेव गावच्या हद्दीत गोरक्षक अमोल जाधव (रा. मलटण, ता. फलटण) यांना लाल रंगाची ओमनी कार समोरून येताना दिसली. त्यावेळी अमोल जाधव व शरद गाडे यांनी ती कार थांबवून आतमध्ये पाहिले असता तीन देशी एक ते दीड वर्षे वयाच्या गोवंशीय कालवडी पाय व तोंड दोरीने बांधून दाटीवाटीने गाडीत कोंबल्या होत्या. त्याबाबत गाडीचालकाला विचारले असता तेथे पाठीमागून एक पिकअप गाडी व पांढर्या रंगाची स्वीफ्ट कार आली. त्यातील अमीर मेहबूब मुलाणी (रा. कोळकी, फलटण) याने पिस्टल काढून अमोल जाधव याच्या डोक्याला लावले व इनायत कुरेशी, हुसेन बालाजी कुरेशी, वाहिद याकूब कुरेशी, आरबाज इम्तियाज कुरेशी व सद्दाम शैकत व्यापारी व इतर सहा जण यांनी हातातील लोखंडी गज, कोयता, हॉकी स्टीक यांनी अमोल जाधव यास जबर मारहाण केली. यात अमोल जाधव हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर ते सर्व आरोपी आपापल्या गाड्या घेऊन पळून गेले.
याबाबतची फिर्याद शरद गाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी सुमारे १२ ते १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.