दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । मुंबई । देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा यांच्यासह अनेक अज्ञात नायकांनी दिलेले योगदान हे ज्ञात स्वातंत्र्य सेनानींइतकेच अतुलनीय होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अशा अज्ञात स्वातंत्र्य नायकांचे तसेच स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या लेखणीतून अभिव्यक्त होणाऱ्या लेखक, कवी, व्यंगरचनाकार, लोकगीतकार व नाटककार यांचे चरित्रदेखील समाजापुढे आले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
तुहीन सिन्हा व अंकिता वर्मा या युवा लेखकांनी लिहिलेल्या बिरसा मुंडा यांच्या जीवनावरील ‘द लेजंड ऑफ बिरसा मुंडा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १९) राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, एकोणीसाव्या शतकामध्ये देशभक्तीने ओतप्रोत होऊन कार्य करणारे अनेक स्वातंत्र्ययोद्धे भारतात निर्माण झाले. अवघे २५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या अवमानाने प्रक्षुब्ध होऊन जननी, जन्मभूमी तसेच मातृभाषेच्या गौरवासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यामुळे सामान्य जनतेने त्यांना देवत्व बहाल केले. भगवान बिरसा मुंडा संपूर्ण देशासाठी आदर्श असून त्यांचे प्रेरणादायी चरित्र मराठीसह इतर भाषांमध्ये भाषांतरित व्हावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक निरंजन शेट्टी, भामला फाउंडेशनचे संस्थापक असिफ भामला व इतर मान्यवर उपस्थित होते.