दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । मुंबई । सन 1965 साली भारताने पाकिस्तानवर विजय प्राप्त केल्यावर तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला होता. भारतीयांमध्ये संरक्षण दलांप्रती अतिशय आदराची भावना आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे सैन्य दलातील हुतात्म्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, जायबंदी झालेले जवान यांच्या कल्याणासाठी विविध संस्थांनी कर्तव्य भावनेने अधिकाधिक योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.
सशस्त्र सेना ध्वज दिनाचे औचित्य साधून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपालांच्या जॅकेटला सशस्त्र सेनेच्या ध्वजाचे तिकीट लावण्यात आले व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.
महाराष्ट्राप्रमाणेच उत्तराखंड राज्यात देखील सशस्त्र सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची मोठी परंपरा आहे. आपल्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्याने देखील तरुण वयात देशासाठी बलिदान दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सर्व हुतात्म्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते असे सांगून राज्यपालांनी ध्वज निधीला योगदान देणाऱ्या संस्था, सार्वजनिक उपक्रम व शासकीय कार्यालयांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी ले.जन. एच.एस. कहलों, नौसेनेच्या पश्चिम विभागाचे मुख्य अधिकारी व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एअर ऑफिसर कमाडिंग हेडक्वाटर, मेरिटाईम एअर ऑपरेशन रजत मोहन, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, सैनिक कल्याण विभागाचे संचालक राजेश पाटील तसेच ध्वज निधीला योगदान देणात्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सन 2021-22 या वर्षात निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी ध्वज निधीला आपले योगदान दिले. राज्यपालांच्या हस्ते दिलीप गुप्ते लिखित “महारथी महाराष्ट्राचे भाग – 3” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हुतात्मा अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांना एक-भारत रजत मुद्रिका भेट देण्यात आली.
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांनी गेल्या वर्षी 6.5 कोटी इतका ध्वज निधी संकलित केल्याचे सांगून आगामी वर्षात दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी 3.84 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याचे उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी ध्वज दिन निधी संकलन कार्याचा इतिहास सांगितला.