
स्थैर्य, फलटण, दि. 18 नोव्हेंबर : फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या लढतीने आता थेट राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतले आहे. ऐनवेळी ‘राजे गटा’ने शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेऊन आपले युवा नेतृत्व, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, यांना नगराध्यक्षपदाच्या आखाड्यात उतरवले आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले जाहीर झाल्यापासूनच ‘राजे गटा’च्या कार्यकर्त्यांमध्ये श्रीमंत अनिकेतराजे यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मागणी होती, आणि ती पूर्ण झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे, ही निवडणूक आता केवळ नगरपालिकेची न राहता, थेट ‘प्रतिष्ठेची’ बनली आहे.
श्रीमंत अनिकेतराजे यांच्या उमेदवारीमुळे फलटणकरांसमोर एक दिशादर्शक पर्याय उभा राहिला आहे, असे जाणकार सांगतात. कारण, श्रीमंत अनिकेतराजे हे उच्चविद्या विभूषित असून त्यांना कामाचा अनुभव आहे. या उच्च शिक्षणाचा आणि आधुनिक दृष्टिकोनाचा फायदा निश्चितच फलटण शहराच्या विकासाला होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. ‘राजे गटा’ने अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताच, कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला असून आता प्रचाराच्या कामाला वेग येणार आहे.
श्रीमंत अनिकेतराजे यांच्यासमोर सध्या फलटणच्या राजकारणातील मोठे आव्हान उभे आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘राजे गटा’समोर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने उभे राहिलेले राजकीय आव्हान मोडून काढण्याची मोठी जबाबदारी श्रीमंत अनिकेतराजे यांना पेलायची आहे. दोन प्रमुख नाईक निंबाळकर घराण्यातील ही थेट लढत फलटणच्या इतिहासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.
आता लवकरच श्रीमंत अनिकेतराजे यांच्या प्रचाराची यंत्रणा शहरात जोर धरणार आहे. ‘राजे गटा’ची पारंपरिक ताकद, शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ आणि स्वतः श्रीमंत अनिकेतराजे यांचा उच्चविद्याविभूषित चेहरा, या त्रिसूत्रीच्या आधारावर ते सर्वसाधारण मतदारांवर कशा प्रकारे प्रभाव पाडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. फलटणच्या गादीचा हा युवा वारसदार निवडणुकीच्या रणांगणात कोणती राजकीय खेळी खेळतो आणि मतदारांचे मन कसे जिंकतो, यावरच नगराध्यक्षपदाचा ‘राजमुकुट’ कोणाला मिळणार हे ठरणार आहे!

