
दैनिक स्थैर्य । 12 मे 2025। सातारा । सातार्यात रस्त्यांवर आणि फुटपाथवर टपर्या टाकून, शहराचे विद्रुपीकरण करणे अद्याप सुरुच आहेत. पालिकेने ठरवलेल्या हॉकर्स झोनचा बट्ट्याबोळ झाला आहे. वर्दळीचे रस्ते आणि मोकळ्या जागा टपरीवाल्यांना हक्काच्या वाटत आहेत. त्यामागे दडलेले अर्थकारण आणि त्यातून सोकावलेले फळकुटदादा, हेच खरे वादाचे कारण आहे. मोती चौक ते पंचमुखी गणपती यादरम्यान नो हॉकर्स झोन जाहीर झाल्याने, हॉकर्स विरुद्ध पालिका प्रशासन असा सामना पुन्हा एकदा रंगला आहे.
हॉकर्स झोनसंदर्भात पालिका प्रशासन आणि फेरीवाला समिती यांच्या दोन बैठका झाल्या. त्यामधून काहीच निष्पन्न झाले नाही. मुळात फेरीवाला समिती आणि त्यामध्ये समाविष्ट शासकीय, अशासकीय सदस्य यांचा ताळमेळच न बसल्याने, फेरीवाला समितीचे धोरण कागदावरच राहिले आहे. पालिका प्रशासनाने अळूचा खड्डा, रविवार पेठेतील जुन्या मशिदीच्या पिछाडीची जागा आणि पंचायत समितीच्या रस्त्यावर 1 हॉकर्स झोन ठरवून दिले होते. शहरात 111 विक्रेते अधिकृत ठरवण्यात आले होते. मात्र, नंतर हा आकडा हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत गेला. पालिकेने काही रस्त्यांवर नो हॉकर्स झोन जाहीर केल्याने, वादावादीला पुन्हा सुरुवात झाली आहे. सदाशिव पेठेतील छोट्या विक्रेत्यांना महात्मा फुले भाजी मंडई परिसरात जागा देण्यात आली आहे. मात्र, मंडईच्या अंतर्गत भागात ग्राहक येणार नाहीत, असे सांगून विक्रेत्यांनी त्यास नकार दिला आहे. म्हणजे हॉकर्स संघटनेची मनमानी, हे वादाचे मूळ कारण आहे. त्याचा फटका गरजू विक्रेत्यांना बसत आहे.
मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या टपर्या टाकून, मलई लाटायचा अनेकांचा उद्देश आहे. त्यातून हॉकर्स झोन अस्तित्वातच येऊन द्यायचा नाही, असे आडमुठेपणाचे धोरण मोडून काढायला हवे. पोवई नाका येथे शिवतीर्थाचा परिसर विकसित होत असताना, त्याला पडलेला टपर्यांचा विळखा अद्याप सुटलेला नाही. पोवई नाका ते हुतात्मा चौक, सेव्हन स्टार इमारत परिसर, तहसील कार्यालयाच्या भिंतीलगतच्या टपर्या, राधिका रस्त्यावरील प्रस्तावित प्रांत कार्यालयासमोरच्या बंद टपर्या, यामुळे शहराचे विद्रूपीकरण वाढत आहे.
याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी संपर्क साधला असता, नो हॉकर्स झोन आणि हॉकर्स झोनची अंमलबजावणी करणारच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.