दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण शहरांमधील गावठाण भागामध्ये श्री जबरेश्वर मंदिर पुरातत्व विभागामध्ये नोंदणीकृत असल्याने सदरील मंदिराच्या 100 मीटर व 200 मीटर अंतरामध्ये बांधकाम करण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी काढण्याची अट होती. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे मंत्री किसन रेड्डी यांनी सदरील अट तातडीने शिथिल करून तेथील रहिवाशांना दिलासा देण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत.
सदरील अट शिथिल करण्यात यावी म्हणून गावठाणातील रहिवाश्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे मागणी केलेली होती. गावठाणातील नागरिकांच्या मागणीनुसार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने पुरातत्त्व विभागांमध्ये पाठपुरावा करून सदरील मागणी शिथिल करण्यात यावी असे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार आगामी काही दिवसांमध्ये सदरील अट शिथिल करण्यात येण्याबाबतचे स्पष्ट निर्देश केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे मंत्री किसन रेड्डी यांनी दिलेले आहेत.
दैनिक मुक्तागिरीचे फलटण तालुका प्रतिनिधी व साप्ताहिक युवा जनमतचे संपादक युवराज पवार यांनी श्री जबरेश्वर मंदिर परिसरामधील पुरातत्त्व विभागाची अट शिथिल करण्यात यावी याबाबत वारंवार संबंधित विभागामध्ये पाठपुरावा केला होता. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामार्फत सुद्धा युवराज पवार यांनी वारंवार पाठपुरावा करून सदरील अट शिथिल करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे पुरातत्व विभागाची अट शिथिल करण्यात आली असल्याने त्याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे युवराज पवार यांनी विशेष आभार मानले.