संमेलन मराठी भाषेसाठीचा लढा तीव्र करणारे ठरेल

संमेलनाच्या माजी अध्यक्षांना विश्वास


स्थैर्य, 3 जानेवारी, स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे केवळ शब्दांचा उत्सव नसून, तो मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृतीच्या मंथनाचा सोहळा असतो. सातारा येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा संवर्धनाच्या मुद्द्यावर चर्चा होत असल्यामुळे हे संमेलन मराठी भाषेच्या अस्तित्वाचा लढा तीव्र करणारे ठरेल, असा विश्वास संमेलनांच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास माजी अध्यक्षांनाही सन्मानाने निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनाच्या आयोजनातील वेगळेपणासंदर्भात तसेच संमेलनाच्या मंचावरून होत असलेल्या विचारमंथनाविषयी त्यांची मते जाणून घेतली. ऐतिहासिक सातारा नगरीत साहित्याचा जागर होत असताना भाषा संवर्धनाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले गेले ही जमेची बाजू असल्याने मत नोंदविण्यात आले.

व्यावहारिक प्रश्नही उपस्थित : डॉ. श्रीपाल सबनीस
माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आयोजनाचे कौतुक करतानाच काही मार्मिक निरीक्षणे नोंदवली. यंदाच्या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ तात्त्विक चर्चा न करता व्यासपीठावरून व्यावहारिक प्रश्नही उपस्थित करण्यात आले. ते म्हणाले, मराठी शाळांची दुरवस्था, ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही निधीचा अभाव, हे कळीचे मुद्दे उद्घाटन भाषणात येणे ही मोठी बाब आहे. मात्र, राजकारण्यांना साहित्यिकांपेक्षा अधिक प्राधान्य देण्याची मानसिकता अजूनही कायम असल्याचे शल्य त्यांनी बोलून दाखवले.
साहित्यातून राजकारण्यांना ‘निती’चे दर्शन : डॉ. अरुणा ढेरे
प्रसिद्ध लेखिका आणि माजी संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी या संमेलनातील संवादाचे स्वागत केले. साहित्यिकांनी केवळ मनोरंजन न करता राजसत्तेलाही दिशा दाखवली पाहिजे. राजव्यवहार कोश आणि तपोवनासारखे विषय मांडून राजकारण्यांना नितीची आठवण करून दिली गेली, हे या संमेलनाचे यश आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संमेलनाध्यक्षांचे भाषण सर्वस्पर्शी : भारत सासणे
संमेलनाचे संयोजन आखिव-रेखीव आहे, असे सांगून भारत सासणे म्हणाले, संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. संमेलनाच्या निमित्ताने चांगले आयोजन, प्रतिसादही चांगला आहे. संमेलनातील परिसंवाद, चर्चासत्रे वेगळपणा दर्शविणारी आहेत. संमेलनाध्यक्षांचे भाषण सर्वांगाला स्पर्श करणारे ठरले आहे याचा विशेष आनंद आहे.

चिंतन आणि ठोस उत्तराची अपेक्षा : लक्ष्मीकांत देशमुख
संमेलनाचा आरंभ देखणा झाला. विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. मराठी भाषा, हिंदीची सक्ती हे प्रश्न यावेळी मांडले गेले. त्याला मुख्यमंत्र्यांनी हिंदीची सक्ती आणि मराठीचा वापर यावर दिलेले उत्तर मोघम असून ठोस उत्तराची अपेक्षा आहे. संमेलनाचे विषय ठरवताना आणि मांडताना अजून चिंतन व्हायला हवे, असे मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
सद्यस्थितीतील प्रश्नांचा आरसा : डॉ. सदानंद मोरे
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, यंदाचे संमेलन सद्यस्थितील प्रश्नांना धरून होत आहे, याचा अधिक आनंद आहे. मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी माणसं, महाराष्ट्रातील मराठी राजकारण या विषयांना संमेलनाच्या निमित्ताने स्पर्श केला आहे, जे सहसा होताना दिसत नाही.
मराठीसाठी सर्व घटकांनी एकत्र यावे : डॉ. रवींद्र शोभणे
डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, व्यासपीठावर मराठी भाषेचा मुद्दा प्रकर्षाने मांडला गेला याचा आनंद आहे. मराठी भाषेला व्यवहारिक दृष्ट्या मागे खेचल्यामुळेच मराठी माध्यमाच्या शाळांकडे लोकांचा कल कमी होत गेला. मराठी माध्यमाच्या शाळांना गळती लागून १५-२० वर्षे झाली आहेत. त्यामुळे ही समस्या लगेच सुटेल असे नाही. पण हा प्रश्न सगळ्यांनीच जिव्हाळ्याने मांडला. मराठी भाषेला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वच घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मराठी भाषेला चांगले दिवस नक्की येतील.


Back to top button
Don`t copy text!