
सातारा – 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीच्या शुभारंभप्रसंगी शरणकुमार लिंबाळे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी व मान्यवर.
स्थैर्य, सातारा, दि. 16 डिसेंबर : साहित्य संमेलन आरशाप्रमाणे असते. समाजाच्या साहित्यिक व सांस्कृतिक चेहर्याचे प्रतिबिंब त्यात उमटते. संमेलनासाठी उभारण्यात येत असलेला मंडप हा सातारकरांच्या मायेचा पदरचआहे. सातारा येथे होत असलेले संमेलन म्हणजे पुस्तके, लेखक-वाचक, कलावंत यांचा महोत्सव ठरावा. समाज शस्त्रावर नव्हे तर पुस्तकांवर विश्वास ठेवतो. साहित्य संमेलने लोकांचे, लेखकांचे, राष्ट्राचे मन उन्नत करण्यासाठी आयोजित केली जातात. त्यामुळे सातारा येथे होणारे संमेलन यशस्वी तर होईलच, पण वेगळेपण जपणारे ठरेल, असा विश्वास सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे दि. 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा शाहुपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित या संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे आज (दि. 16) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी शरणकुमार लिंबाळे बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
लिंबाळे पुढे म्हणाले, साहित्य संमेलनाची वाटचाल शताब्दीकडे सुरू असतानाच्या 99 व्या टप्प्यावरचे हे संमेलन आहे. संमेलनांचा प्रारंभ पुण्यात 1878 पासून झाला. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे या समाजधुरिणांनी ही पायाभरणी केली. तेव्हा लेखक आणि समाज यांच्यात संवाद साधला जावा, हीच अपेक्षा होती. लेखक हाही समाजाचा घटक असतो. त्यामुळे संमेलनात आरशाप्रमाणे समाजमनाचे प्रतिबिंब लेखकांच्या माध्यमातून पडत असते. संमेलन ही लेखक, प्रकाशकांची वाचकांशी होणारी थेट भेट असते. संमेलनातून समाजाची वाचनसंस्कृती प्रकट होते. वाचन माणसाची जडणघडण करते, माणूस घडवण्याचे कार्य करते. त्यामुळे संमेलनाच्या निमित्ताने होणारी या सर्वांची भेट अगत्याची ठरते.
संमेलनात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दिसेल
यांनीही सातारचे साहित्य संमेलन वेगळेपण जपणारे ठरेल. संमेलनाच्या वातावरणनिर्मितीचे उपक्रम आता सुरू होत आहेत. संमेलन सातारा शहरापुरते नसून, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व संमेलनात दिसेल. सातारकरांच्या सहकार्याने आम्ही संमेलन सुंदर पद्धतीने आणि उत्तम नियोजनाने यशस्वी करू.
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्वागताध्यक्ष

