दैनिक स्थैर्य । दि.२३ जानेवारी २०२२ । सातारा । खासगी सावकारीतून एका छोट्या बाळाला एका दांम्पत्याने ठेवून घेतले या प्रकाराचा पोलीस तपास सुरु आहे. याप्रकरणी फिर्यादी व संशयित आरोपींची चौकशी सुरु असून फिर्यादी महिलेने हे बाळ 15 की 30 हजार रुपयांना विकले असल्याचे तपासात समोर येत आहे. बाळ बेकायदेशीपणे ताब्यात ठेवणे हा देखील गुन्हा असून फिर्यादी व संशयित पोलीस ठाण्यात आहेत. त्यांची चौकशी सुरु असून त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्हाडे यांनी दिली.
याबाबत माध्यमांशी बोलताना बोर्हाडे यांनी सांगितले की, फिर्यादी पायल कुचेकर या महिलेने जून 2021 मध्ये हे बाळ बाबर दांम्पत्यांना देवून त्यांच्याकडून 15 वा 30 हजार रुपये घेतल्याचे ती सांगत आहे. तिने बाळ विक्री केल्याचे तपासात समोर येत आहे. यामध्ये या महिलेने हे बाळ का दिले, बाबर दांम्पत्यावर त्यांचा नेमका काय व्यवहार ठरला हेही तपासात समोर येईल. मात्र, ज्यांनी हे बाळ ठेवून घेतले त्या बाबर दांम्पत्याचे कृत्यही बेकायदेशीर असून त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच फिर्यादी पायल कुचेकर व बाबर दांम्पत्य सातारा शहर पोलीस ठाण्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी संबंधित एक वर्षाचे बाळ ताब्यात घेतलेले असून त्याला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून बाल शिशूगृहात ठेवण्यात आले आहे. बाल कल्याण समितीच्या निर्णयानुसार यात पुढील निर्णय घेतला जाईल. दरम्यान, हा प्रकार सावकारीतून घडला आहे का? असे विचारले असता बाबर हे खासगी सावकारी करतात किंवा नाही. त्याबाबत काही तक्रारी, साक्षीदार, पुरावे मिळाल्यास त्या अनुषंगाने पोलीस चौकशी व तपास करतील. जर तसा खासगी सावकारीचा प्रकार असल्यास त्यानुसार देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असेही बोर्हाडे यांनी सांगितले.