स्थैर्य, फलटण : सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेवून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी फलटण शहरात शुकशुकाट पहायला मिळाला. मेडिकल, दवाखाने, पेट्रोल पंप आदी ठिकाणे वगळून संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने बाजारपेठेत तसेच शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये निर्मनुष्य रस्ते पहायला मिळाले.
कोरोनाच्या संकटामुळे सुमारे मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु झालेले लॉकडाऊन मे महिन्याच्या मध्यापासून टप्प्याटप्प्याने उठवण्यास प्रशासनाने सुरुवात केली होती. मात्र गत काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी 17 जुलै पासून 26 जुलै पर्यंत क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू केले आहेत. या जाहीर झालेल्या लॉकडाऊननुसार जिल्ह्यातील किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर व्यवसाय करणारे व्यापारी संकुल आदीचे व्यवहार दिनांक 22 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी फलटण शहरात झाली असल्याचे पहायला मिळाले.