शहरातील नागरिक बिनधास्तपणे पाय मोकळे करायला बाहेर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १२ : करोनाचा सामुदायिक फैलाव सध्या सातारा शहर व परिसरात सुरू आहे. हा स्प्रेड रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. असे असताना शहरातील नागरिक बिनधास्तपणे पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडत आहेत. पण त्यांना  करोनाची बाधा होईल याची कसली भीती नाही. त्याचा प्रत्यय दररोज सायंकाळी 5 नंतर शिवराज टिकटने ते खिंडवाडी या दरम्यान वॉकिंग करणाऱ्यांची रीघ लागल्याचे दिसत आहे. वाढे फाटा ते लिंब खिंड यादरम्यान काही हॉटेल नियम मोडून सताड उघडी असतात. याच दरम्यानचा सेवा रस्ताकडेने मोकळ्या जागेत व शहरालगत असलेल्या मोकळ्या जागेत सायंकाळी आखाडी पार्ट्या झडू लागल्या आहेत. पोलिसांचा कारवाईचा दंडुका आवश्यक असून बाहेरच्या जिल्ह्यातील पसिंगच्या गाड्या प्रत्येक वॉर्डात दिसत आहेत. शहरातील वॉर्ड समितीचे सदस्य डाराडूर झाले आहेत.शहरात सध्या अफवांचे पेव मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यात हाफ लॉकडाऊन केले आहे. तरीही काही नागरिक मोकाटपणे बिन कामाचे फिरत आहेत. कम्युनिटी स्प्रेड प्रचंड वाढला असून शहरात दररोज कोणी ना कोणी बाधित सापडत आहे. तरीही कोणाला याची धास्ती नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी सायंकाळी गर्दी दिसते. शहरालगत असलेल्या उपनगरात तर नियमांचे तीन तेरा वाजले जात आहेत. शहरलगत शिवराज पेट्रोल पंप ते खिंडवाडी या दरम्यान अनेक नवीन कॉलन्या, अपार्टमेंट, बंगले, हॉटेल्स झाले आहेत. त्यातील काही नागरिक सकाळी आणि सायंकाळी दररोज पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडताना दिसत आहेत. तसेच अजिंक्यतारा, चार भिंती व यवतेश्वर घाटात गर्दी दिसत आहे. काहींच्या तोंडावर मास्क ही नसते. तोच प्रकार वाढे फाटा ते लिंब खिंड या दरम्यान पहायला मिळतो. सेवा रस्त्यावर सायंकाळी फिरणाऱ्याची मोठी गर्दी असते. काही हॉटेल्स आणि मिठाईची दुकाने नियम मोडून सुरू असतात. तर सेवा रस्त्यालगत एका हॉटेलच्या समोर मोकळ्या जागेत दररोज ओल्या पार्ट्या सुरू असतात. सातारा पोलिसांनीं सायंकाळी या परिसरात गस्त वाढवून कारवाई करणे गरजेचे आहे.

शहरात 20 प्रभागात 40 वार्ड आहेत 40 वार्डात 40 दक्षता कमिट्या केल्या आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी या कमिट्या केल्या आहेत. या कमिट्यातले सदस्य कोठे असतात?, शहरात वॉर्डात बाहेरून कोण आले याची त्यांना कसलीही कल्पना नसते. जेव्हा कोरोना बाधित रुग्ण आढळला की मात्र पळापळ सुरू होते. या दक्षता कमिटीच्या सदस्यांना कारवाईचे अधिकार दिले गेलेत परंतु कोणत्याही समितीच्या सदस्यांनी आज पर्यंत बाहेरून आलेल्या व नियम मोडणाऱ्या कोणावर कारवाई केल्याचे कोठे नमूद नाही. त्यामुळे सातारा शहरातील दक्षता समित्या डाराडूर असल्याचे दिसत आहे.

कोरोना कसा येईल हे कोणालाच सांगता येत नसले तरी सातारकर मोकाटपणे फिरत आहेत. त्यांच्यावर पुर्वी कडक लॉक डाऊनमध्ये जशी कारवाई केली जात होती तशी पुन्हा सातारा पोलिसांनी करणे गरजेचे आहे असे सर्वसामान्य सातारकर नागरिकांची मत व्यक्त होऊ लागले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!