दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । मुंबई । कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निधी समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ही समिती मदत व पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत निर्देश देतानाच समितीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार मकरंद पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते तर आमदार पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
या समितीच्या मार्फत कोयना भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येणाऱ्या आठ तालुक्यांच्या दुर्गम भागात वसलेल्या गावांच्या विकासासाठी भूकंप पिडितांना अर्थसहाय्य देण्यात येते. समितीमार्फत सन २०२२-२३ मध्ये विकासकामांसाठी प्रस्तावित ३० कोटी रुपये यावेळी मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर महाजेनकोने मार्च पर्यंत ३५ कोटी रुपये देण्याचा निर्णय यावेळी झाला.
ही समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीत येत असून ती मदत व पुनर्वसन विभागास हस्तांतरीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता देतानाच समितीसाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश दिले.