दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२३ । मुंबई । जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघातातील जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कामोठे एमजीएम रुग्णालयात प्रत्यक्ष भेट घेवून विचारपूस व त्यांचे सांत्वन केले. जखमींवर योग्य ते उपचार करण्याबाबत सूचना दिल्या.
यावेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख, एमजीएम रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्स आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देश दिले.
या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.
अपघातग्रस्त आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, जखमींच्या आरोग्याबद्दल विचारपूस करत त्यांना दिलासा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.