मुख्यमंत्र्यांनी केले राज्यातील गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । मुंबई । सारथी व बार्टी या संस्थेच्या प्रत्येकी २१ व ९ विद्यार्थ्यांसह राज्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळवले आहे ही अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब असून या सर्व विद्यार्थ्यांनी या महत्त्वाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्राचे नाव मोठे केले, त्यांचे खूप कौतूक वाटते अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सारथीचे प्रयत्न

सारथीने मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत नि:शुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससीच्या मुलाखतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक स्वरूपात तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास अर्थात सारथी ही संस्था लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करणारी संस्था आहे. त्यातील उमेदवांराचे स्पर्धात्मक परीक्षेत यश वाढवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सारथीकडून केले जातात

बार्टीचे प्रयत्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य शासनाच्या मदतीने देण्यात आलेल्या प्रशिक्षणातून अनुसूचित जातीतील ९ विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. बार्टीमार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. मागील काही कालावधीत कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण व इतर मदत करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!