सातार्‍यात नटराज मंदिराचा रथोत्सव सोहळा उत्साहात


स्थैर्य, 2 जानेवारी, सातारा : येथील नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा संपन्न झाला. रथात मूर्तिदान सोहळा संपन्न झाल्यावर वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी, वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील श्री आनंद नटराज, शिवकाम सुंदरी देवी, राधाकृष्ण, गणपती, हनुमान, उमादेवी अय्यप्पा, चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज आदींच्या पंचधातूच्या मूर्ती वाजत गाजत रथामध्ये स्थापन करण्यात आल्या .त्यानंतर ब्रह्मवृंदांनी 108 भगवान शंकराची नावे घेऊन पुष्पांजली अर्पण केली.

या रथोत्सवाचे पूजनासाठी श्री व सौ कार्तिकेयन, श्री व सा.ै नागराजन, श्री. मुरली श्रीनिवासन व त्यांची सुविद्य पत्नी सौ. सुधा मुरली, ठाणे, मुंबई.जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे. नूतन नगरसेविका वैशाली प्रकाश राजेभोसले व प्रकाश राजेभोसले यांच्या हस्ते या रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाजत गाजत ढोल ताशांच्या निनादात आणि सनईच्या मंगल सुरामध्ये हा भव्य रथ शेकडो नटराज भक्तांच्या उपस्थितीत संपूर्ण मंदिर परिसराला प्रदक्षिणा घालून सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक कडे मार्गस्थ झाला. मंदिरात रथ पूजनाच्या वेळी 51 सुवासिनी महिला हातात मंगल कलश घेऊन उभ्या होत्या.

याप्रसंगी नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग , त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उषा शानभाग, नारायण राव, सी .के. शहा, वासुदेव नायर व्यवस्थापक चंद्रन ,संकेत शानभाग , सौ कविता शानभाग, राहुल घायताडे, रमेश हलगेकर ,मोहनराव शानभाग,सौ.प्रभा भट,अभिनव भट, सुहास शहाणे ,सौ ,कांचन शहाणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सातारा शहरातून हा रथ नटराज मंदिरातून बाहेर पडल्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानावरून साई मंदिर, गोडोली तेथून पोवई नाका, नगरपालिका चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे मोती चौकातून राजवाडा येथे येऊन त्यानंतर मोती चौकातून सदाशिव पेठ मार्गे, 501 पाटी ,शनिवार पेठ मार्गे पोलीस मुख्यालयावरून ,पोवई नाका येथे येऊन त्यानंतर कुबेर गणपती मंदिर मार्गावरून डीएसपी बंगला तसेच पुन्हा नटराज मंदिरात सायंकाळी सहा वाजता संपूर्ण शहरातून मिरवणूक पार पाडल्यानंतर मंदिर परिसरात आल्यावर महाआरती करून प्रसाद वितरण करण्यात आला.
दरम्यान, शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत श्री नटराज देवाला महाअभिषेक, लघुरुद्र व शिवकाम सुंदरी व नटराज यांचा लग्नसोहळा होणार आहे. त्यानंतर आरती व महाप्रसाद वितरण होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!