
दैनिक स्थैर्य । 21 एप्रिल 2025। सातारा । सातारच्या पत्रकारितेचे आम्हीही नेतृत्व केले होते पण आम्हाला जिल्हा पत्रकार भवन, अधिस्वीकृतीचे अध्यक्षपद, आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष इथपर्यंत पोचता आले नाही. आमच्या काळात पाय ओढले जायचे. यात बदल घडवून असूया मत्सर याला फाटा देऊन हरीष पाटणे व विनोद कुलकर्णी यांनी मैत्रीचा अध्याय रचून सातारच्या साहित्य व पत्रकारितेची उंची वाढवली. आम्हाला जे करता आले नाही ते या दोघांनी करून दाखवले याचा आम्हाला अभिमान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ संपादक बापूसाहेब जाधव यांनी काढले.
वरिष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सातार्यातील पत्रकारांच्यावतीने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरीष पाटणे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते. व्यासपीठावर दिनकर झिंब्रे, श्रीकांत कात्रे, तुषार भद्रे, संभाजी पाटील यांचीही उपस्थिती होती. सातारा पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघ, डिजीटल मिडीया तसेच छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
बापूसाहेब जाधव पुढे म्हणाले, या पोरांनी 25 वर्षांत कमाल करुन दाखवली आहे. ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत. तरुण सहकार्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. विनोद कुलकर्णी यांना मिळालेले हे पद सातार्यासाठी भूषणावह आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्यातच व्हावे, ही आमची अपेक्षा आहे.
हरीष पाटणे म्हणाले, सातारच्या पत्रकारितेत मैत्रीच्या भावनेतून माणसे उभी करण्याचे काम आम्ही केले. विनोदला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामध्ये कोषाध्यक्ष पद मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. सातार्याला साहित्याचा मोठा वारसा असल्याने येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे ही सातारकरांची इच्छा आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक पत्रकारांना मदत व सहकार्य केले आहे. महाराष्ट्रात कुठे नाही अशी सातारा जिल्हा पत्रकार संघाची वास्तू आम्ही उभी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. पत्रकारितेत केलेल्या संघर्षामुळे, माणसे उभी करण्याच्या भूमिकांमुळे, आजवर आम्हाला मान सन्मान मिळत गेले हे सातारच्या पत्रकारितेचे आमच्यावर असलेले प्रेम आहे. विनोद कुलकर्णी यांनी साहित्यिक कार्यकर्ता म्हणून केलेली आंदोलने, सातत्याने केलेले उपक्रम व त्यामाध्यमातून केलेली साहित्यसेवा यामुळे त्यांना यापदापर्यंत त्यांना जाता आले.
सत्कारमूर्ती विनोद कुलकर्णी म्हणाले, साहित्य क्षेत्राशी मी वेगवेगळ्या कारणांनी जोडलो आहे. वृत्तपत्र क्षेत्रात काम करताना मला अनेक अनुभव आले असून पत्रकारिकेमुळे मी यशस्वी झालो आहे. हरीषने मला अनेक वर्ष खंबीरपणे साथ दिली आहे. आमच्यामध्ये कल्पकता असल्याने आम्हाला मानाची पदे मिळाली आहेत. 15 जिल्ह्यातला मी पहिलाच महामंडळाचा पदाधिकारी आहे, हाच सातारचा अभिमान आहे. सन 1993 नंतर अद्यापही सातार्यात साहित्य संमेलन झाले नाही. सातार्यात साहित्य संमेलन व्हावे, ही माझी भूमिका आहे. मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे म्हणाले, जिल्ह्याला साहित्यिकांची मोठी परंपरा आहे. पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी ती परंपरा जपत सातार्यात अनेक उपक्रम घेतले आहेत. यामुळेच साहित्यिकांशी निगडीत शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी झालेली त्यांची निवड स्तुत्य आहे. सातारच्या पत्रकारितेचा हा बहुमान आहे.
यावेळी प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, दिनकर झिंब्रे, श्रीकांत कात्रे, तुषार भद्रे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, राहूल तपासे, गजानन चेणगे, दिपक माने, जितेंद्र जगताप, चंद्रकांत देवरुखकर, श्रीकांत मुळे, प्रमोद इंगळे सातार्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल ताटे तर आभार सचिन काकडे यांनी मानले.