
स्थैर्य, सिलिगुडी, दि. ७: कोलकातामध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिलिगुगडीमध्ये पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी LPG सिलेंडरच्या वाढत्या किमतीवरुन केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, भारताला एका सिंडिकेटबाबत माहिती आहे. हे सिंडिकेट मोदी आणि अमित शहांचे आहे. पंतप्रधान जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटे बोलतात. भाजपसारखा पक्ष बंगालमध्ये सत्तेत आल्यावर येथील जनता धोक्यात येईल.
पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान भाजप नेत्यांकडून वारंवार ‘खेला होबे’ शब्दाचा वापर करण्यात येत आहे. याबाबत बोलताना ममता म्हणाल्या की, ‘खेला होबे.’ आम्ही खेळण्यासाठी तयार आहोत. मी वन-ऑन-वन खेळण्यासाठी तयार आहे. जर भाजपवाले मतांसाठी तुम्हाला पैसे देत असतील, तर पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा. आता परिवर्तन बंगालमध्ये नाही, तर दिल्लीमध्ये होणार.
नंदीग्राममध्ये ममता – शुभेंदू यांच्यात चुरस – पश्चिम बंगालमध्ये या वेळी सर्वाधिक उत्कंठावर्धक निवडणूक नंदीग्राममध्ये होणार आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पारंपरिक भवानीपूर मतदारसंघाऐवजी फक्त नंदीग्राममधून लढत आहेत. भाजपने ममतांचे माजी निकटवर्तीय आणि गतवेळी येथून जिंकलेल्या शुभेंदू अधिकारी यांना तिकीट दिले आहे.