
दैनिक स्थैर्य । 3 मे 2025। सातारा । पंतप्रधान सरकारने जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे. याबद्दल पंतप्रधानांच्या अभिनंदनाचे ठराव भाजपच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामपंचायती, बूथ आणि मंडलांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, या क्रांतिकारी निर्णयाबद्दल पंतप्रधानांच्या अभिनंदनाचे ठराव राज्यातील एक लाख 186 बूध, 1280 मंडल समित्यांसह 27 हजार ग्रामपंचायतींमध्ये करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, मंडल आणि बूथ स्तरावर अभिनंदनाचे ठराव घेण्याची तयारी करण्यात आली आहे. जातनिहाय जनगणनेमुळे देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्व सुरू होईल. जातनिहाय जनगणना हा लोकशाही मजबूत करणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीची पाऊलवाट अधिक पक्की होईल, अशी खात्री आहे.
जातनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आता का गप्प बसले आहेत? इतके दिवस जातनिहाय जनगणना करा, म्हणून घसा कोरडा करणारे नेते, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल केंद्रातील मोदी सरकारच्या अभिनंदनाचे औदार्य दाखवणार की, नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार, हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे. काँग्रेसने आजवर
जातनिहाय जनगणनेला विरोधच केला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजवर योग्य पद्धतीने जातनिहाय जनगणना कधीच झाली नाही. त्यामुळे असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. 1951 ते 2011 या काळात जेवढ्या जनगणना झाल्या, त्यात अनुसूचित जातीजमातींची आकडेवारी दिली गेली. मात्र, ओबीसी समाजाची आकडेवारी कधीच दिली गेली नाही. जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेते हा आपलाच अजेंडा आहे आणि आमच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याची दपोंक्ती करत आहेत. मोदी सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.
सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याने, हे सरकार असल्या दर्पोक्तीला भीक घालत नाही. सर्वसामान्यांच्या मागणीमुळेच मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशामध्ये अनेक जातीचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत. अनेक जातींच्या लोकसंख्येची अचूक माहिती मिळत नसल्याने, त्यांच्यावर अन्याय होत होता. त्यांना आरक्षण किंवा इतर कोणतेही लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या, जातनिहाय जनगणना झाल्यास, प्रत्येक जातीच्या नागरिकांची संख्या अधिकृतरित्या समजणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय दूर होण्यास मदत होणार आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले
राज्य मंत्रिमंडळाच्या कार्यप्रणालीच्या शंभर दिवसांमधील कामाच्या अवलोकनामध्ये ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचा दुसरा आणि ना. जयकुमार गोरे यांच्याकडील ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्रालयाचा चौथा क्रमांक आल्याबद्दल या दोघांचे पक्षाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन 150 रुपये वाढ करण्याच्या निर्णयाबद्दल राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करण्यात आले. पत्रकार परिषदेपूर्वी सकाळी पोवई नाका येथे भाजपच्यावतीने जल्लोष करण्यात आला. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल नागरिक, कार्यकर्त्यांना लाडू भरवण्यात आले. यावेळी धैर्यशील कदम, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुवर्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, माजी शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा पूर्व मंडलाध्यक्ष नीलेश नलावडे, बाह्य मंडलाध्यक्ष वैशाली टंगसाळे, मध्य मंडलाध्यक्ष अविनाश खर्शीकर, पदाधिकारी उपस्थित होते.