स्थैर्य, नवी दिल्ली,दि.१८: प्रसिद्ध कार कंपनी जग्वार लॅंड रोव्हर आपल्या कर्मचारी संख्येत कपात करणार असून, एकूण 2 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार असल्याचे कंपनीने बुधवारी घोषित केले. तसेच कंपनीने लग्जरी जग्वार ब्रँडची घोषणाही यावेळी केली आहे. कंपनीच्या सर्व गाड्या 2025 पर्यंत इलेक्ट्रिक होणार असून, 2030 पर्यंत हे सर्व ई-मॉडेल लाँच केले जातील, असे जग्वार कंपनीने स्पष्ट केले आहे. जग्वार लँड रोव्हर कंपनीच्या सर्व कामकाजाचा आढावा घेत असून पुढील आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये कंपनी जवळपास 2 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीत कपात करणार असल्याचे कंपनीने एक मेलमध्ये म्हटले आहे.
उत्पादन कर्मचाऱ्यांवर परिणाम नाही
तथापि, संस्थात्मक समीक्षामुळे ताशी वेतन आणि उत्पादन कर्मचार्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. टाटा मोटर्स ऑफ इंडियाच्या मालकीच्या जेएलआरने याआधीच सांगितले होते की, येत्या पाच वर्षांत 2024 पर्यंत त्यांचे लँड रोव्हर ब्रँड पूर्णपणे इलेक्ट्रिक होईल आणि ईव्हीस लाँच करण्यास सुरवात करेल.
इलेक्ट्रिक मार्केटमध्ये लवकरच एन्ट्री करण्याची इच्छा
सन 1960 आणि 1970 च्या दशकातील आपल्या प्रतिष्ठीत, उच्च-कार्यक्षमता ई-टाईप मॉडेलसाठी प्रसिद्ध असलेल्या जग्वारला इतर अनेक कार उत्पादकांकडून कडवी टक्कर मिळत आहे. सर्व कार कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक मॉडेलमध्ये प्रवेश केला असून लवकरात लवकर इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा जग्वारचाही प्रयत्न आहे.
इलेक्ट्रॉनिक लग्जरी ब्रँडमध्ये शानदार कार आणणार
जग्वारने म्हटले आहे की, कंपनी ऑल इलेक्ट्रॉनिक लग्जरी ब्रँडमध्ये एक शानदार कार मार्केटमध्ये आणेल. याआधी 9 मार्च रोजी भारतात आपली इलेक्ट्रिक एसयुव्ही आय-पेस लाँच केली होती. लँड रोव्हर डिफेंडरच्या डिजिटल एडिशनला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने जग्वार आय-पेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आय-पेस ग्राहकांना चार्जिंग सोल्युशन देण्यासाठी कंपनीने टाटा पॉवरशी करार केला आहे.