
सातारा – गांधी मैदान भव्य मेघडंबरी उभारून त्यामध्ये शिवरायांचा सिंहासनावर बसलेला भव्य पुतळा. (छाया : अतुल देशपांडे)
स्थैर्य, 19 फेब्रुवारी, सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी निमित्त ऐतिहासिक शाहू नगरी अर्थात सातारा शहर हे अक्षरशः शिवमय आणि भगवे झाल्याचे दिसून येत आहे .सातारा शहर परिसरातील विविध सामाजिक उपक्रम राबवणार्या मंडळांनी या शिवजयंतीला एक वेगळाच अनोखा उत्साह घेतला होते . शहरातील प्रमुख मार्गांवरील चौका, चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे ऐतिहासिक देखावे तसेच राजपथावर करण्यात आलेली आकर्षक भगव्या कमानी, पताका आणि झालरिंची विद्युत रोषणाई सजावट विशेष लक्षवेधक ठरत होती.
प्रत्येक 100 मीटर वर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी व त्यावर साकारलेले छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील तानाजी मालुसरे ,बाजीप्रभू देशपांडे ,मुरारबाजी ,राजमाता जिजाबाई यांचे भव्य कटआउट हे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरत होते . सातारा शहरातील गांधी मैदान राजवाडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध जीवनातील प्रसंगांना चित्ररूप करून त्याचे भव्य फलक उभारण्यात आले असून शिवराय हे दर दहा वर्षांनी कसे दिसत असेल याचाही नजारा भव्य कट आउट मधून येथे प्रथमच लावण्यात आला असून तो पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत होती .शहराच्या ऐतिहासिक जुना राजवाडा आणि नव्या राजवाड्याला
नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई तितकीच लक्षवेधक ठरत होते . सातारा शहरातील मराठा सराफ संघटनेच्या वतीने आज सकाळी शहरातून ढोल ताशांच्या गजरात घोड्यावर पारंपारिक वेशात असलेल्या नऊवारी साडीतील छोट्या मुली आणि भगवे फेटे आणि पारंपारिक देशात बसलेले बालक लक्ष वेधून घेणारे होते. अनेक महिलांनी यावेळी भगवे फेटे बांधून नऊवारी साडीतून या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला सजवलेल्या रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर आरुढ झालेली लक्षवेधक मूर्ती ही तितकीच देखणी होती .जय भवानी ,जय शिवाजी..च्या गजराने तसेच फटाक्याच्या आतशीबाजीत ही मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दरम्यान सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील डीएम ग्रुपने ऐतिहासिक दीपमाळा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर बसवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची अर्ध पुतळ्याची मूर्ती लक्ष वेधून घेणारे ठरत होती. केसरकर पेठेतील मयूर सोशल क्लब मावळा प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे उभारलेले देखावे ही तितकेच लक्षवेधक होते .पवई नाका येथील शिवतीर्थावर सकाळपासूनच छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती .अनेक पर जिल्ह्यातील युवा तरुण हातामध्ये शिवज्योती घेऊन ही दौड पूर्ण करताना दिसत होते. अनेक मंडळांनी सज्जनगड ,प्रतापगड ,महिमानगड, वर्धनगड ,सिंहगड येथून या शिवज्योती आणून त्याचे विधिवत पूजन केले .. सातारा शहरातील मोती चौकातील श्री. छ. प्रतापसिंह मंडळाच्या वतीने भव्य अश्वारूढ शिवरायांचा उभारलेला पुतळा लक्ष वेधून घेणारा ठरत होता .शहरातील प्रमुख रस्त्यांवर काढलेल्या विविध रंगाच्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार्या महा रांगोळ्या ही तितक्याच लक्ष वेधून घेणार्या होत्या.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी गुरुवारी संपूर्ण सातारा जिल्हा हा शिवमय झाल्याचे दिसून येत होते. सातारा शहरातील प्रमुख चौका चौकात मंडळांनी उभारलेल्या भव्य मेघडंबरी तसेच स्वागत कमानी आणि भगव्या पताकांनी परिसर भगवा झाल्याचे दिसून येत होते .शहरातील राजवाडा परिसरातील गांधी मैदान भव्य मेघडंबरी उभारून त्यामध्ये शिवरायांचा सिंहासनावर बसलेला भव्य पुतळा बसवण्यात आला होता या पुतळ्यासमोर दिवसभर शिवभक्ता आणि अभिवादनासाठी गर्दी केली होती तसेच येथून अनेक मंडळांनी शिवज्योतीही मंडळांपर्यंत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणात नेल्या तसेच जिल्ह्यातील सज्जनगड, प्रतापगड ,चंदन- वंदन ,अजिंक्यतारा यासारख्या दुर्गांवरून तसेच नजीकच्या पुणे जिल्ह्यातील सिंहगड, रायगड ,राजगड, पुरंदर येथूनही शिवज्योती आणून त्याचे पूजन करण्यात आले.
दरम्यान सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील सार्वजनिक गणेश मंडळाने भव्य ऐतिहासिक देखावा करून त्यामध्ये शिवरायांची प्रतिमा स्थापन केली होती .यापुढे बालचमुंना शिवाजी ,तानाजी, जिजाबाई यासारख्या पारंपारिक पोशाखातील ऐतिहासिक पोशाखात नटलेल्या मावळे आणि शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ..जय भवानी जय शिवाजी..च्या घोषात गर्जना करताना दिसत होते .शहरातील राजपथावरील माहेश्वरी समाजाने भव्य मेघडंबरी उभारून त्यामध्ये शिवरायांची मूर्ती स्थापन केली होती .शनिवार पेठेतील 501 पाटी जवळच्या मंडळांनी फुलपाखरांच्या भव्य पंखांच्या पार्श्वभूमीवर शिवरायांची प्रतिमा स्थापन केली होती .दिवसभर एकंदरीतच शिवरायांच्या जय जयकाराचा माहोल दिसून येत होता. विररसाचे पोवाडे तसेच शाहिरी गीते ठिकठिकाणी लावून हा परिसर दुमदुमून गेला होता.

