प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार, पण रणजितसिंहांचा ‘विकास-वारू’ सुसाट! नीरा-देवधर ते प्रशासकीय इमारत; कामांच्या बळावर ‘महायुती’ मारणार बाजी!


स्थैर्य, फलटण, दि. ०४ फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उद्या, दि. ०५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा अधिकृतपणे थंडावणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) चे नेते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण फलटण तालुका पिंजून काढत विरोधकांचे मनसुबे उधळून लावले आहेत. जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १६ जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात असून, हा विजय केवळ राजकीय नसून रणजितसिंहांनी केलेल्या ‘ठोस विकासकामांचा’ विजय असेल, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

भावनिक राजकारणाला ‘विकासा’चे चोख उत्तर

राजे गटाकडून निवडणुकीत केवळ भावनिक मुद्दे आणि सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या निवडणुकीची दिशाच बदलून टाकली आहे. “आम्ही मते मागतोय ती कामाच्या बळावर, पोकळ आश्वासनांवर नाही,” या एका वाक्यावर त्यांनी विरोधकांची बोलती बंद केली आहे.

रणजितसिंहांचे ‘रिपोर्ट कार्ड’: ज्याच्या बळावर मतदारांचा कौल निश्चित!

गेल्या ५ वर्षांत, आणि विशेषतः विरोधात असतानाही रणजितसिंहांनी फलटणच्या विकासाचा जो ‘बॅकलॉग’ भरून काढला, तोच आज महायुतीच्या विजयाचा पाया ठरत आहे. प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात रणजितसिंहांच्या खालील कामांची चर्चा प्रत्येक मतदाराच्या ओठावर आहे:

१. पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा: ज्या नीरा-देवधर प्रकल्पाचे पाणी बारामतीला पळवले जात होते, त्याविरोधात थेट शरद पवारांशी संघर्ष करून रणजितसिंहांनी फलटणच्या हक्काचे पाणी मिळवून दिले. बंदिस्त कॅनॉल आणि धोम-बलकवडीचे बारमाहीकरण यामुळे शेतकऱ्यांच्या रानात पाणी पोहोचले.

२. प्रशासकीय चेहरामोहरा बदलला: फलटणची भव्य प्रशासकीय इमारत, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय आणि RTO ऑफिस यांसारख्या इमारती उभ्या करून त्यांनी फलटणला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या दिशेने पाऊल टाकले.

३. पायाभूत सुविधा: पालखी महामार्गाचे काम असो किंवा पोलीस वसाहत आणि विविध पोलीस स्टेशन्सच्या आधुनिक इमारती; रणजितसिंहांनी पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही कसर सोडली नाही.

४. सामाजिक बांधिलकी: स्वतःच्या खर्चातून २०,००० हून अधिक मुलींना सायकल वाटप करून त्यांनी महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

फलटण तालुक्यातील हजारो युवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंहांचे नेतृत्व स्वीकारल्याने महायुतीचे पारडे जड झाले आहे.

उद्या रात्री प्रचाराचा धुराळा खाली बसेल, पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पेरलेले विकासाचे विचार मतदारांच्या मनात कायम आहेत. त्यामुळे विधानसभेत सचिन पाटील, नगरपालिकेत समशेरसिंह आणि आता जिल्हा परिषदेत महायुतीचे शिलेदार, असा ‘ट्रिपल इंजिन’ सरकारचा प्रयोग फलटणमध्ये यशस्वी होणार, यात आता शंका उरलेली नाही.


Back to top button
Don`t copy text!