सी-२० प्रतिनिधी घेणार सांस्कृतिक कार्यक्रम आणि वऱ्हाडी खाद्यपदार्थांचा आस्वाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । नागपूर । शहरात २१ आणि २२ मार्च रोजी जी २०- अंतर्गत सी-२० परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास वऱ्हाडी खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन स्तरावर नियोजन आखण्यात येत असून तयारीला वेग आला आहे.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज सी-२० परिषदेच्या आयोजनासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्तांनी प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तथा सी-२० सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प प्रभुनाथ शुक्ला, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार कोकाटे यांच्यासह जी -२० परिषदेच्या आयोजनात सहभागी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२१ मार्च रोजी फुटाळा तलाव येथे फाऊंटन शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या शोनंतर तेलंगखेडी गार्डनमध्ये वऱ्हाडी भोजनाचा आस्वाद जी-२० परिषदेचे पाहुणे घेणार आहेत. २२

मार्चला दिवसभर नागरी परिषदेच्या चर्चासत्र, परिसंवादानंतर सायंकाळी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची सादरीकरण माहितीसह पाहुण्यांसमोर करण्यात येणार आहे. नियोजनात कुठलीही त्रुटी राहु नये यासाठी तयारीचा आढावा १० मार्च रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे.

बैठकीदरम्यान भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तथा सी-२० सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनीही परिषदेच्या सिव्हिल २० परिषदेच्या आयोजनामागील भूमिका व संभाव्य नियोजन याविषयीची माहिती उपस्थितांना दिली


Back to top button
Don`t copy text!