सत्ताधाऱ्यांचा बैल गेला अन झोपा केला कारभार – अशोक मोने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । सातारा । जेव्हा कोरोना महामारीचा कहर सुरु होता तेव्हा सातारा पालिकेने सातारकरांसाठी साधं एक आयसोलेशन सेंटर सुरु केलं नाही. आता कोरोना रुग्ण कमी होत असताना आणि लस सर्वत्र उपलब्ध असताना सत्ताधाऱ्यांनी शहरात ‘मोफत लसीकरण’ अशी बॅनरबाजी सुरु केली आहे. एकीकडे डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची ‘शो बाजी’ सुरु आहे. हा बैल गेला अन झोपा केला कारभार कधी सुधारणार, असा वास्तववादी सवाल विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, सातारा शहरात कोरोनाचे थैमान सुरु होते, त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. लस मिळत नसल्याने अनेकांनी स्वखर्चाने लस घेतली. कोरोनामुळे हैराण झालेले सातारकर मोठ्या आशेने सत्ताधाऱ्यांकडे पाहत होते पण, पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडर यातच सत्ताधारी गुरफटले होते. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शहरात लसीकरण कॅम्प घेतले जात आहेत मात्र त्यातही ‘शो बाजी’ करून सत्ताधाऱ्यांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. लसीकरण घेतले जात आहे हि बाब चांगलीच आहे. उशिरा का होईना शहाणपण सुचले याबद्दल सत्ताधाऱ्यांचे आभार मानले पाहिजेत.

सत्ताधाऱ्यांचा बैल गेला अन झोपा केला कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून आता डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. यावर पालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे, कचरा आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी कोरोना लसीकरणाच्या बॅनरबाजीत धन्यता मानत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सातारकरांना नेहमीच बसला आहे आणि आताही बसत आहे. लसीकरण कॅम्प आणि तुमची बॅनरबाजी सुरु राहू द्या पण, डेंग्यू पासून सातारकरांना वाचवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, असे मोने यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!