दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२३ । फलटण । तालुक्यातील वाखरी येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलची इमारत ही धोकादायक झाली असून संस्थेच्या वतीने तातडीने नूतन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी वाखरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. शुभांगी शिंदे यांनी केली आहे.
याबाबत वाखरीच्या ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच सौ. शुभांगी शिंदे बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच सौ. शिंदे म्हणाल्या की, वाखरी गावामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या इमारतीची अत्यंत अशी दुरवस्था झालेली आहे. नुकत्याच झालेल्या इरशाळवाडी घटनेप्रमाणे जर एखादी घटना या इमारतीच्या बाबतीत घडली तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सुद्धा ग्रामस्थांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहे.
आम्ही संस्थेशी वारंवार संपर्क साधून सुद्धा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आज पत्रकार परिषदेद्वारे आमची भूमिका जाहीर केलेली आहे. आगामी काळामध्ये जर संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही; तर वाखरी गावामध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील नामांकित संस्थेला शाळा सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न राहील; असे मत भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.