
दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२२ । औंध । आज दुपारी औंध परीसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या धुव्वाधार पावसात नांदोशी ता खटाव येथील शिवाजी ज्ञानू जाधव यांची म्हैस अंगावर वीज पडल्याने जाग्यावर ठार झाली. तसेच वडी ता खटाव येथे आंदाव नावाच्या शिवारातील नारळाच्या झाडावर वीज पडली मात्र सुदैवाने कसलीही हानी झाली नाही.
आज दुपारी औंधसह परीसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. नांदोशी येथे वेताळबा शिवारात शिवाजी जाधव यांनी आपली म्हैस बांधली होती. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसात म्हैशीच्या अंगावर वीज पडल्याने म्हैस जाग्यावर ठार झाली. दरम्यान वीज पडल्याच्या आवाजाने परीसरात चांगलीच घबराट निर्माण झाली होती. नांदोशीचे तलाठी मराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन म्हैशीचा पंचनामा केला आहे.
तसेच वडी येथे आदांव नावाच्या शिवारातील विहरीजवळच्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळून गेले. सुदैवाने यामध्ये कसलीही जीवीतहानी झाली नाही. वडी येथे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यती पावसामुळे थांबवाव्या लागल्या त्यामुळे बैलगाडी मालक आणि शौकीन यांच्या आनंदावर पाणी फिरले.