बौद्ध महामेळावा हजारोंच्या उपस्थितीत संपन्न

सर्व-धर्म-समभावाचे दर्शन : विविध जाती-धर्मांचा पाठिंबा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाच्या उमेदवारीसाठी संविधान समर्थन समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेला बौध्द समाज बांधवांचा महामेळावा पावसाच्या हजेरीत, उत्साही वातावरणात, विविध समाजघटकांच्या पाठिंब्यासह हजारोंच्या उपस्थितीत फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात संपन्न झाला.

महामेळाव्यापूर्वी तब्बल दीड महिना नियोजन समितीतील २५-३० पदाधिकार्‍यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मेळाव्याची माहिती देत बौद्ध उमेदवारीच्या मागणीची पार्श्वभूमी स्पष्ट केली होती. संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाज बांधवांच्या निर्णय व पाठिंब्यानंतर फलटणमध्ये महामेळावा यशस्वी पार पाडण्यात आला.

मेळाव्याच्या सुरुवातीला समता सैनिक दल व सुमारे दोनशे स्वयंसेवकांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देत अभिवादन केले. यावेळी महिला व मुलींचे सवाद्य लेझीम प्रात्यक्षिक, युवकांचे झांजपथक यासह शेकडो भीमसैनिकांची पायी रॅली काढण्यात आली. त्यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन अ‍ॅॅड. शाम अहिवळे यांनी केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, संविधान समर्थन समितीचे अध्यक्ष सनी काकडे, मराठा क्रांती मोर्चाचे पंकज पवार, धनगर समाजाचे नानासाहेब इवरे, दादासाहेब चोरमले, माळी समाजाचे गोविंद भुजबळ, नाभिक समाजाचे बाळासाहेब काशीद, मुस्लिम समाजाचे जमशेद पठाण, मेहतर समाजाचे राजू मारुडा, उद्धव कर्णे यांची भाषणे झाली.

माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार, आमदार रोहित पवार यांनी फोनद्वारे व माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे महामेळाव्याला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांनी भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. नवोदित गायक सागर भोसले यांनी महामेळाव्यावर आधारित गीत गायले. बौद्ध धम्म प्रसारक दिव्या शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत समितीतील सर्व सदस्यांनी केले. प्रास्ताविक सनी काकडे, सूत्रसंचालन वैशाली कांबळे व सचिन मोरे यांनी केले. आभार शक्ती भोसले यांनी मानले.

महामेळाव्यास सुनील सस्ते, सुनील गरुड, राहुल निंबाळकर, संदीप नेवसे, जालिंदर जाधव, सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सौ. वैशाली सुधीर अहिवळे, श्री. निंबाळकर, सागर कांबळे यांच्यासह संविधान समर्थन समितीचे सर्व सदस्य, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाज बांधव, विविध जाती-धर्मातील प्रमुख पदाधिकारी, तरुण, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामेळावा यशस्वी करण्यासाठी मधुकर काकडे, विजय येवले, संजय निकाळजे, सुधीर अहिवळे, संजय गायकवाड, नंदकुमार मोरे, बापूसाहेब जगताप, दत्ता अहिवळे, संग्राम अहिवळे, हरीष काकडे, उमेश कांबळे, दया पडकर, विकी काकडे, महादेव आप्पा गायकवाड, अमित भोसले, रोहित माने, सागर अहिवळे, राजेंद्र काकडे, साईनाथ भोसले, बंटी साबळे, सूरज अहिवळे, वैभव काकडे आदींनी परिश्रम घेतले.

विविध जाती-धर्मांचा पाठिंबा

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी मराठा क्रांती मोर्चा, धनगर समाज, माळी समाज, मुस्लिम समाज, वडार समाज, संत रोहिदास चर्मकार समाज, कुंची कुर्वी समाज, मेहतर समाज, पारधी समाज यांच्यासह शेतकरी संघटना, बहुजन मुक्ती पार्टी (सातारा जिल्हा) यांनी महामेळाव्यादरम्यान जाहीर पाठिंबा दिला.

सर्व-धर्म-समभावाचे दर्शन

बौद्ध महामेळाव्याच्या निमित्ताने फलटण शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना विविध प्रकाराच्या रंगीत फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रमुख चौकात स्वागत कमान, विविध रंगांचे ध्वज उभारण्यात आले होते. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांच्या प्रतिमा स्क्रीनवर लावून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!