जुनगाव येथील पूल पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांचा विकासाचा मार्ग ठरेल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । चंद्रपूर ।  पावसाळ्यात महिना- महिनाभर पुराच्या वेढ्यात राहून संपर्क  तुटणाऱ्या जुनगावाला आता पोंभुर्णा आणि चामोर्शी मार्गावर दोन मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. हे पुल जुनगाव व लगतच्या गावांसाठी कायम विकासाचा मार्ग ठरतील, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

जुनगाव ते पोंभुर्णा मार्गावरील पुलाचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी जुनगाव येथील ग्रामस्थांनी जागोजागी औक्षवान केले ,फटाक्याची आतिषबाजी करत जंगी स्वागत केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरूण गाडेगोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद देशमुख,माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी,सरपंच पूनम चौधरी, उपसरपंच राहुल पाल,हरी ढवस, ओमदेव पाल ,अजय मस्के, पांडुरंग पाल,उपविभागीय अभियंता मुकेश टांगले प्रामुख्याने उपस्थित होते.

या पुलासाठी २४ कोटी ७६ लक्ष रकम मंजूर केली असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जुनगाव ते चार्मोशी मार्गावरील दुसऱ्या पुलासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचेतर्फे ७० कोटी मंजूर देण्यात झाले आहेत. या दोन्ही पुलाचे बांधकाम पुढील दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

‘हेल्थ इज वेल्थ’ ध्यानात ठेवून आरोग्यसेवेचे बळकटीकरण, आजच्या बालकांच्या उज्वल भविष्यासाठी उत्तम शिक्षणपद्धती, शेतीसाठी बारा महीने पाणी, गरजूंना घरकुल आदी विकासकामांच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्याच्या निरंतर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

यावेळी बहारदार संचालन करणा-या जुनगाव जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी नटेश्वर तिवारी व राजेश्वरी गेडाम यांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आपले विचार व्यक्त केले, या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!