दैनिक स्थैर्य । दि.०१ मे २०२२ । माण । कासारवाडी(ता. माण) येथील नटराज पांडुरंग सस्ते या युवकाने मटण खायला का घालत नाही म्हणून वडील पांडुरंग बाबुराव सस्ते यांचा शेतामध्ये पाठलाग करून, कुऱ्हाडी सारख्या धारधार शस्त्राने डोक्यात आणि मानेवर वार करून खून केला.
नटराज पांडुरंग सस्ते हा युवक मटण वारंवार का आणत नाही आणि मला का खायला घालत नाही. यावरून त्यांच्याशी वारंवार हुज्जत घालायचा. वडील त्याला नेहमी समजवायचे आपली परिस्थिती बेताची आहे. मटण खूप महाग असल्यामुळे ते नेहमी आपल्याला आणून खायला परवडत नाही. तरीदेखील तो वडिलांना धमकी द्यायचा कुठूनही पैसे आणि मला खाण्यासाठी मटण घेऊन या नाहीतर मी तुम्हाला जीवे मारीन. यागोदर ही त्याने मटण का आणले नाही या कारणांवरून वडिलांवर जीवघेणा हल्ला ही केला होता. त्यामध्ये मात्र वडील अनेकदा बचावले होते. तरीदेखील वडिलांनी अनेकदा परिस्थिती नसतानाही त्याला अनेकदा मटण खायला घातल्यामुळे त्याला त्याची चांगलीच चटक लागली होती. त्यामुळे त्याला मटण खायला नाही मिळाले कि तो वेड्यासारखा करायचा आणि वडिलांच्या अंगावर मारण्यासाठी धावायचा.
शुक्रवार, दि 29 रोजी तो वडिलांना मटण आणण्यासाठी आग्रह करत होता पण वडिलांनी पैसे जवळ नसल्याने त्यांनी मटण आणण्याचे टाळले . त्यामुळे चिडून जाऊन घरामध्ये तो वडिलांच्या अंगावर जाऊन त्यांना जोरदार मारहाण करू लागला. मारहाणीच्या भीतीने वडील सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास शेताच्या दिशेने पळू लागले. परंतु माथेफिरूने वडिलांचा पाठलाग करत हातामध्ये असलेल्या धारदार कुऱ्हाडीने फिल्मी स्टाईलने वडिलांच्या डोक्यामध्ये सपासप पाच ते सहा वार करून खून केला. वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले. सदर घडलेल्या घटनेची तक्रार पत्नी चतुराबाई पांडुरंग सस्ते यांनी दहिवडी पोलिसांमध्ये दिली.
पुढील तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. जी. तुपे करत आहेत.