पुस्तक दालनाचा उतरविला होता तब्बल 40 कोटी रुपयांचा विमा

10 लाख साहित्यप्रेमींची भेट : आठ कोटी 72 लाख रुपयांची पुस्तक विक्री


स्थैर्य, 5 जानेवारी, पुणे : सातारा येथे आयोजित करण्यात आलेले शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनेक गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. चार दिवसात सातार्‍यासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून तसेच देश-विदेशातून जवळपास 10 लाख साहित्यप्रेमींनी संमेलनास भेट दिली असून जवळपास आठ कोटी 72 लाख रुपयांची पुस्तकविक्री झाली आहे. पुस्तक दालनाचे यंदाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे पुस्तकांचा आणि पुस्तक खरेदासाठी येणार्‍या साहित्यरसिकांचा तब्बल 25 कोटींचा तर फर्निचर आणि इतर साहित्याचा चार कोटी 30 लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. संमेलनाच्या 99 वर्षांच्या इतिहासात पुस्तके, पुस्तक दालन आणि पुस्तक खरेदीसाठी येणार्‍या साहित्यप्रेमींचा विमा उतरविणारे हे पहिलेच संमेलन ठरले आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशनतर्फे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्‍यातील शाहू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले होते.

सातार्‍याला 33 वर्षांनंतर संमेलनाचे आयोजन करण्याचा मान मिळाल्यानंतर संयोजकांसह सातारकर साहित्यप्रेमी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दिने कामाला लागले होते. याची प्रचिती संमेलनादरम्यान येत होती. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका, विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते झाले तर समारोप समारंभास ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

योग्य नियोजनाअभावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक, ग्रंथविक्री होत नाही, अशा तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते करीत होते. यावर यंदा तोडगा काढण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग ग्रंथ दालनातूनच ठेवण्यात आल्यामुळे संमेलनास येणारा प्रत्येकजण ग्रंथ दालनातूनच जात-येत होता.
मुख्य मंडपासह परिसंवाद-परिचर्चेसाठी उभारलेला दुसरा मंडप तसेच बाल-कुमार वाचककट्टा, गझल-कवी कट्टा, पुस्तक प्रकाशन मंच येथे चारही दिवस आयोजित केलेल्या प्रत्येक उपक्रमाला साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसले. गर्दीच्या दृष्टीनेही हे संमेलन विक्रमी ठरले.

साहित्य रसिकांनी संमेलनास मोठ्या संख्येने हजेरी तर लावलीच पण शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चारही दिवस संमेलनात हजेरी लावली. संमेलन कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसह दहा लाख साहित्य रसिकांनी भेट दिली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पुस्तक विक्रीवर झाल्याचे दिसून आले आहे. बालवाङ्मयापासून ऐतिहासिक कादंबर्‍या, कथा, कविता, समीक्षात्मक पुस्तकांबरोबरच स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके प्रदर्शनात असल्यामुळे सर्व प्रकारच्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकंदरीत आठ कोटी 72 लाख रुपयांची पुस्तक विक्री झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी दिली.

ऐतिहासिक सातारा नगरीत झालेल्या संमेलनात पुस्तक आणि पुस्तक दालनात येणार्‍या साहित्य रसिकांचा ओरिएंटल इन्शुरन्सच्या सातारा शाखेतर्फे 25 कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला तर बुक स्टॉल तेथे असलेल्या फर्निचरसाठी 4 कोटी 30 लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. संमेलनाचे मुख्य चार दिवस आणि त्या आधीचे तीन दिवस असा सात दिवसांचा विमा उतरविण्यात आला होता. साहित्य संमेलनाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

संमेलनातून दूर गेलेल्या रसिकांना सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा साहित्याच्या मांडवात आणण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. शतकपूर्व संमेलन वाचककेंद्री, साहित्यकेंद्री आणि पुस्तककेंद्री व्हावे यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. संमेलनास मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता या संमेलनाची स्पंदने सातारच्या मातीत दीर्घकाळ रेंगाळत राहतील आणि यातून अनेक नवे साहित्यिक निर्माण होतील असा विश्वास आहे.
– मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

सातारा नगरीला जशी ऐतिहासिक परंपरा आहे, त्याप्रमाणे सातारा शहर आणि जिल्ह्यात साहित्यप्रेमी, वाचक मोठ्या संख्येने आहेत. शतकपूर्व संमेलन साहित्य प्रेमींच्या सहभागातून व्हावे यासाठी जे सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते ते विद्यार्थी, साहित्य रसिकांचा मिळालेला प्रतिसाद बघता यशस्वी ठरले आहेत.
– विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ


Back to top button
Don`t copy text!