विजय मांडके यांच्या ” वारी समतेची ” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
स्थैर्य, सातारा दि. १८ : वारकरी परंपरेने स्त्री-पुरुष विषमतेवर प्रहार केलेले आहेत व जातीव्यवस्था वारकरी परंपरेला मान्य नाही आणि याला प्रमाण असणारे असंख्य अभंग उपलब्ध आहेत. विजय मांडके यांनी देखील त्यांच्या पुस्तकात हे अभंग अंतर्भूत केलेले आहेत म्हणुनच विजय मांडके यांचे वारी समतेची हे पुस्तक वारकरयांसाठी निश्र्चितच दिशादर्शक असे आहे. असे प्रतिपादन ह.भ.प. डॉ सुहास महाराज फडतरे यांनी व्यक्त केले आहे.
सम्यक विद्रोही प्रबोधन संस्थेच्या वतीने सातारा येथील विद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्र चे उपाध्यक्ष व पत्रकार विजय मांडके लिखित ‘वारी समतेची’ या लेख संग्रहाच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून आँनलाईन पध्दतीने लाईव्ह ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, पुस्तकाचे लेखक विजय मांडके, मयुर अरुणा जयवंत हे सहभागी झाले होते.
ह. भ. प. सुहास फडतरे यांनी वैदिक परंपरा ही शोषणाची परंपरा होती. वारकरी परंपरा ही त्या विरोधात जाणारी समतावादी परंपरा आहे आणि विजय मांडके यांची त्यांच्या या पुस्तकातून त्यावर प्रकाश टाकला असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय मांडके यांचे पुस्तक लेखनासाठी अभिनंदन करून कॉ. धनाजी गुरव म्हणाले की या पुस्तकात संत तुकोबारायांची व संत ज्ञानोबांची पालखी सुरुवातीला एकत्रित निघत असताना वेगळी का सुरू केली याचा उल्लेख केला आहे. यावर पुढील काळात संशोधन होणे गरजेचे आहे.
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पालखी मार्ग आणि ज्ञानोबा माऊली यांचा पालखी मार्ग याबाबत पुस्तकात लिहिले आहे. तुकोबाराय यांचा पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातुन जातो तर ज्ञानोबांचा पालखी सोहळ्याचा मार्ग शिवरायांच्या स्वराज्याला विरोध करणारांच्या प्रदेशातुन जातो असे सांगून कॉ. धनाजी गुरव म्हणाले की यावर पुढील काळात सविस्तर असं लिहावे.
पंढरपूरच्या विठ्ठलाची आरती करताना गायले जाणारे पुरुषसुक्त हे वारकरी परंपरेच्या भूमिकेशी सुसंगत नाही व त्यासाठी पुढील काळात हस्तक्षेप करण्याची गरज असल्याची धनाजी गुरव यांनी सांगितले.
विजय मांडके यांनी पुस्तक लिखाणामागची प्रेरणा व भूमिका सुरुवातीला मांडली. वारकरी संप्रदाय स्त्री-पुरुष समता जपणारा, जातिव्यवस्था व अंधश्रद्धा नाकारणारा संप्रदाय असून त्यामुळेच वारी समतेची असे पुस्तकाचे नामकरण केल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन मयूर अरुणा जयवंत यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झालेल्या या कार्यक्रमात अनेक जण सहभागी झाले होते.