स्थैर्य, सातारा, दि.21 : ग्रेड सेपरेटरच्या पाहणीच्या निमित्ताने आलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क उद्घाटन करून प्रशासनाला धक्का दिला होता. त्यानंतर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील महामार्गावरील उड्डाण पुलालाही श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उड्डाणपूल असे नामकरण करून उदयनराजे समर्थकांनी प्रशासनाला आणखी एक धक्का दिला आहे.
खासदार उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरची पहाणी करण्याच्या निमित्ताने थेट उद्घाटन करून तो सातारकरांसाठी नुकताच खुला केला. यावेळी त्यांनी ग्रेड सेपरेटरच्या भुयारी मार्गाच्या चारही प्रवेशाच्या ठिकाणांना चार थोर व्यक्तींची नावे दिली होती. यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) भुयारी मार्ग व श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज भुयारी मार्गअशी नावे दिलेले फलकही लावले. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गाला लावलेला फलक फाटला. यानंतर उदयनराजे समर्थक आक्रमक झाले होते. तथापि, पोलिसांनी तपास करून तो वार्याने फाटल्याचा निष्कर्ष सांगितला. त्यामुळे तणाव निवळला. हा विषय ताजा असतानाच जिल्हाधिकार्यांनी ग्रेड सेपरेटरचे शासकिय उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करत याची जबाबदारी बांधकाम विभागावर दिल्याचे सांगितले. त्यानंतर उदयनराजेंनी पुन्हा एकदा जिल्हाधिकार्यांसमवेत ग्रेड सेपरेटरची पहाणी केली. तसेच सातारा शासकिय मेडिकल कॉलेजच्या जागेचीही पहाणी केली. त्यावेळी उदयनराजेंना ग्रेड सेपरेटरच्या दुसर्यांदा होणार्या उद्घाटनावरून पत्रकारांनी छेडले. त्यावर त्यांनी प्रशासन व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिकेची झोड उठविली. विकास कामे होऊन उद्घाटनाची आम्ही वाट पहायची का, असा प्रश्न उपस्थित करून मेडिकल कॉलेजचेही उद्घाटन होणार! कोण आडवं आलं तर आडवं करणार, असा सूचक दमही त्यांनी भरला.
दरम्यान, उद्घाटनासाठी गर्दी जमविणे, शासकिय कामांचे उद्घाटन करणे, याविरोधात कोणीही तक्रार केलेली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उदयनराजेंची पाठराखण केली होती. मंगळवारी नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री सातार्यात आले होते. त्यांनी यावेळी ग्रेड सेपरेटरचे प्रजासत्ताक दिनी शासकिय उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करून ग्रेड सेपरेटरच्या वादात ठिणगी टाकली. बुधवारी सकाळी उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सातार्यातील बॉम्बे चौकातील महामार्गावरील उड्डाण पुलाला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उड्डाणपूल असे नामकरण करणारा फलक लावला आहे. उदयनराजेंच्या समर्थकांनी सातारकरांसह जिल्हा प्रशासनाला आणखी एक धक्का दिला आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरवरून सुरू झालेला उदयनराजे भोसले व त्यांचे समर्थक विरूध्द जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रवादीचे नेत्यातील वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.