
स्थैर्य, काळाज, दि.१: काळज येथील दहा महिन्यांच्या लहान मुलाचे मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता च्या सुमारास अज्ञातांकडून अपहरण झाल्याची फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात दाखल होती. मात्र आज गुरुवार दि ०१ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सदर अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह घराजवळील विहीरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे.
काळज येथील ओम आदिक भगत वय दहा महिने, रा. रामनगर,काळज अपह्रत मुलाच्या शोधासाठी संशयित असलेल्या २२ ते २५ वर्षांच्या काळा शर्ट व जीन्स घातलेल्या पुरुषाचा व त्याच्या सोबत गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस घातलेल्या महिलेचा शोधासाठी सातारा जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आठ पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली होती. आज सकाळी अपह्रत मुलाचे वडील घरा पाठीमागे असलेल्या विहिरीवर आंघोळीसाठी गेले असताना सदर मुलाचा मृतदेह त्याठिकाणी आढळून आल्याने पोलिसांच्या दोन दिवसांच्या शोधकार्याला पूर्णविराम मिळाला. सदर मृतदेहाचा पंचनामा लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करून मृतदेह सातारा येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
ओम हा दहा महिन्याचा मुलगा भगत दांपत्याला चार मुलींच्या पाठिवर झालेला होता. आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह पाहुन या दांपत्याला भावना अनावर होऊन अश्रूंचा बांध फुटला. एवढ्या लहान जीवावर बेतलेला हा प्रसंग पाहून परिसरातील अनेकांचे डोळे ओलावले. या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.