स्थैर्य, सातारा, दि. ०९ : सातारा जिल्हय़ातील 2 ते 4 हजार शेतकऱयांना लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातून शेतीसाठी पाणी देण्याचा परवाना देण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना अंधारात ठेवून त्यांच्या सहीचे बोगस परवाने देवून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणारा मृद व जलसंधारण विभागातील लिपिक संजय बापू कांबळे (वय 52) त्याच्यावर दाखल असलेल्या तक्रारीचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना अडकवून आता तो देखील गजाआड झाला असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
व्हॉटसऍपवर लाखो रुपये घेवून शेतकऱ्यांना बोगस परवाने देणारा सातारा लघु पाटबंधारे विभागातील लिपिक कांबळे याला सातारा पोलिसांनी अटक केली असल्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मागोवा घेताना करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या संजय कांबळे याची ही कहाणी समोर आलीय. फेब्रुवारी महिन्यात त्याने भ्रष्टाचार करत शासनासह शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार लघु पाटबंधारे विभागाने दाखल केली आहे.
फेब्रुवारीनंतर हे कांबळे साहेब काही पोलिसांच्या हाताला लागत नव्हते. त्यात मध्येच कोरोनाचा कहर समोर आला. लॉकडाऊनच्या काळात कांबळेवर गुन्हा दाखल असून देखील त्याला अटक झालेली नव्हती. या कांबळेने आपल्या पदाचा गैरफायदा घेत लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातून पाणी उपसा करण्यासाठी शासनाचे बोगस परवाने एक लाखापासून पाच लाख रुपयांपर्यंत विकलेले आहेत. याबाबत करोडो रुपये होईपर्यत कार्यकारी अभियंत्यांनाही माहिती नव्हते की त्यांच्या सहीने बोगस परवान्यांचा करोडो रुपयांचा अवैध व्यापार सुरु आहे.
तो प्रकार लक्षात आल्यानंतर मग अभियंत्यांनी कार्यालयामार्फत संजय कांबळेवर रितसर तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. हे कार्यालय संगमनगर पोलीस चौकीच्या हद्दीत येत असल्याने तपास तिकडे गेल्यावर या तक्रारीची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर करत होते. त्यांनी त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागात जावून चौकशी सुरु केली होती. मात्र, कांबळे साहेबांना काही अटक झाली नव्हती.
चौकशी सुरु झाल्यावर साहजिक कांबळे साहेब सुटका करुन घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे वाळवेकरांशी त्यांचा त्याअनुषंगाने संबंध आल्यावर त्यांनी तसे प्रयत्न सुरु केले होते. जवळपास तक्रार दाखल झाल्यानंतर पाच महिन्यांनी या फसवणुकीच्या तक्रारीतून सुटका करुन घेण्यासाठी वाळवेकरांनी तब्बल 25 लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संजय कांबळेनेच दाखल केली होती. मात्र त्याची कुणकुण लागल्याने हे पैसे प्रत्यक्ष घेताना वाळवेकर हाती लागले नाहीत पण त्यांनी लाच मागितल्याचे पुरावे असल्याने त्यांना अटक झाली.
तोपर्यंत हा कांबळे कोठेही उजेडात नव्हता मात्र याच कांबळेला सातारा शहर पोलीस ठाण्याने 6 रोजी अटक केलेली असून करोडो रुपयांच्या भ्रष्टचार करणारा कांबळे आता गजाआड आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलिसांकडून ज्या ज्या शेतकऱयांची फसवणूक होत आहे त्यांना संपर्क साधून फसवणुकीच्या तक्रारी दाखल करुन घेण्याचे काम सुरु आहे.
50 शेतकऱ्यांच्या तक्रार दाखल..सुमारे 50 शेतकऱ्यांनी त्यांना लाखो रुपये बोगस परवाने दिले असल्याची तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे कांबळे साहेबांना आणखीन किती दिवस गजाआड रहावे लागेल हे सांगता येत नसले तरी कांबळेंनी स्वतः जात जाण्यापूर्वी तपासकामात अडथळा यावा म्हणून तपास अधिकाऱ्यांना आत घालवून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी निर्माण केलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याचा ट्विस्ट एका व्हायरल पोस्टमुळे समोर आला असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.