ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही; राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनातून भाजपाचा राज्य सरकारला इशारा


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । मुंबई ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे शनिवारी झालेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, ओबिसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यात एक हजारांहून अधिक ठिकाणी हे आंदोलन झाले.

नागपूर येथील आंदोलनात सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे राजकीय षड्यंत्र आहे. आघाडी सरकारने वेळेत कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असती तर हे आरक्षण रद्द झाले नसते. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची या सरकारची इच्छाच नाही असे वाटते आहे.

कोल्हापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने राज्यभरात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे आरक्षण गमाविण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे पुणे येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की सत्ताधारी पक्षातील काही मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने विरोधी पक्षांच्या सहकार्याने तातडीने हालचाली करायला हव्यात.

खा. डॉ. प्रीतम मुंडे या परळी येथे, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खा. डॉ. भारती पवार या नाशिक येथे, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे हे संभाजीनगर येथे, आ.गोपीचंद पडळकर हे सांगली येथे आंदोलनात सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!