दैनिक स्थैर्य | दि. 19 एप्रिल 2023 | फलटण | फलटण शहरामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथेप्रमाणे जयंती साजरी होत असती. त्यामध्ये या वर्षी फलटण शहरातून दोन मिरवणुकांसाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही मिरणुकींचा मार्ग व वेळ हे वेगवेगळे ठेवण्यात आलेले आहेत. फलटण शहरामध्ये शिवजयंती निमित्त ज्या मिरवणुका संपन्न होणार आहेत; त्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राखूनच संपन्न कराव्यात. फलटण शहर पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त या वेळी असणार आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
फलटण शहरामध्ये यावेळी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन मिरवणुकींना परवानगी देण्यात आलेली आहे. तरी यामध्ये दोन्ही मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे; जर अश्या प्रकारे कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन तातडीने कडक कारवाई करणार असल्याचे सुद्धा यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.
फलटण शहर व तालुक्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, आगामी काळात येणार्या सण-उत्सवाच्या अनुषंगाने सोशल मीडियाचा वापर करीत असताना दोन समाज-दोन गट, जात-धर्म यामध्ये तेढ किंवा वाद होईल, अशा कोणत्याही पोस्ट व्हाट्सअॅप ग्रुप, सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात येऊ नयेत. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणार्यांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात ‘ग्रुप अॅडमिन’ यांनी ‘ओन्ली फॉर अॅडमिन’ ही सेटिंग करून वादग्रस्त विधान किंवा पोस्टमुळे समाजात तेढ, कायदा व सुव्यवस्था यास बाधा निर्माण होईल असे मेसेज पोस्ट करण्यात येऊ नयेत, याबाबतची जबाबदारी ग्रुप अॅडमिनची राहील, अन्यथा सदर वादग्रस्त ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट मेसेज, फोटो प्रसारित करणार्यास ग्रुप अॅडमिनची मूकसंमती होती, असे गृहित धरून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सायबर सेलचे अशा पोस्टवर २४ तास लक्ष आहे.