दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२२ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती कार्यालय यांच्या विद्यमाने सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ११० वा जयंती महोत्सव समितीचे उपसभापती मा. विनोदजी मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी केले व प्रास्ताविक कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी केले, सदर प्रास्ताविक सादर करताना “महापुरुषांच्या पोटी जन्म घेऊन ही स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात याच ज्वलंत उदाहरण म्हणजे भैय्यासाहेब, लहानपणीच न्यूमॅनेटिक आणि पोलिओ आजाराने ग्रस्त असणारा हाच तो स्वयंमप्रकाशित सुर्यपूत्र आहे ज्याने स्वतः जळत बाबासाहेबांच्या धम्मकार्याची मशाल कायमस्वरूपी धगधगती ठेवली. भारत बौद्धमय करीन हा बाबसाहेबांचा संकल्प उराशी घेऊन बाबासाहेबां नंतर एकमेव नेते जे समाजासाठी व धम्मासाठी निस्वार्थी आयुष्य जगले ते म्हणजे यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर” असे गौरवोद्गार काढले, त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणात विनोद मोरे यांनी “शांत, सरळमार्गी व कर्तृत्ववान भैय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा न घेता, स्वकर्तुत्वाने आपले स्वतःचे असे वलय निर्माण केले, राजकिय स्वार्थाचा त्याग करून धम्मकार्यात स्वतःला झोकून चैत्यभूमीची निर्मिती व स्मारक समितीची निर्मिती स्वकर्तुत्वाने करून दाखवली, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्षपद भूषवून त्यानी खेड्यापाड्यात बौद्ध विहारांचे उद्घाटन केले, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ, दिल्ली येथे जागतिक बौद्ध परिषदांमध्ये अनेक महत्वाचे ठराव पारित करून समाजाला नवी दिशा दिली” असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमास समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, उपकार्याध्यक्ष एच.आर.पवार, माजी कार्याध्यक्ष व विश्वस्त किशोर मोरे, माजी उपकार्याध्यक्ष मनोहर मोरे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, खजिनदार नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष चंद्रमनी तांबे, माजी उपकार्याध्यक्ष विवेक पवार, सुरेश मंचेकर, विभागाचे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास गमरे, संदेश खैरे, मुकुंद महाडिक तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, सभासद, सदस्य, कार्यकर्ते, विभागातील सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, सदस्य, कटीकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्या सर्वांनी त्यांच्या मनातील भैय्यासाहेब व त्यांच्या असणाऱ्या जुन्या आठवणींना उजाळा भैय्यासाहेबांच्या कार्याची, त्यागाची माहिती दिली.
सदर प्रसंगी सम्यक कोकण कला संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष भार्गवदास जाधव, कार्याध्यक्ष भगवान साळवी, महासचिव राजाभाऊ तथा रामदास गमरे, मीनाक्षीताई थोरात, अष्टशिला बनसोडे, मुकुंद तांबे, कवी-गायक पवार आदी कलाकारांनी भैय्यासाहेबांच्या जीवनप्रवासावर गीतगायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सरतेशेवटी राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.