नगरपालिकांच्या निवडणुकीत द्रविड ऑफिस समोरील फलक वेधून घेतोय लक्ष


सातारा – गुरुवार पेठेतील द्रविड ऑफिस समोर लावण्यात आलेला आणि अनेक प्रश्नांची सरबत्ती करणारा हा भव्य फलक.
(छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि. 26 नोव्हेंबर : सातारा येथील सातारा नगरपालिकेची निवडणूक प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. येत्या दोन डिसेंबरला होणार्‍या या निवडणुकीसाठी 25 प्रभागातून सुमारे अडीचशे उमेदवार त्यांचे स्वप्न आजमावत असतानाच शहरातील गुरुवार पेठेत असणार्‍या अ‍ॅड. राजगोपाल द्रविड व त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. अमित द्रविड यांच्या निवासस्थानासमोर असणारा फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा फलक वाचून खरोखरच अपेक्षित सुजाण लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण आपले बहुमोल मत दोन डिसेंबरला देणार का असाच प्रश्न पडत आहे. संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात अशा प्रकारचा योग्य निवाडा आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेली कामे याचा पाढाच प्रश्नावलीतून द्रविड परिवाराने या फ्लेक्स रुपी भव्य फलकावर छापलेला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवपालन, मध्यरात्री फटाके वाजविणे, सार्वजनिक उत्सवात डॉल्बी, लेझर लाईट, अडथळा निर्माण करणारे धोकादायक व विनापरवाना फ्लेक्स, सायलेन्सर काढून अपरात्री कर्कश आवाजात बाईक चालविणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भटकी कुत्री नियंत्रण नाही,अवजड वाहनांचे गैरसोईचे पार्किंग, जीवघेणे दुर्लक्ष, रोड सेपरेटर परिसरात् फुटपाथ नाहीत. महिला/पुरूषांकरिता प्रभागात स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात नाहीत,कोणतीही साफसफाई न करता एका दिवसात कोल्ड प्रोसेसने लगेच उखडणारा रस्ता,प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, शहरातील तलाव आणि इतर जलस्त्रोतांची नियमित स्वच्छता नाही,अनधिकृत नळजोडणी,प्रमुख रस्त्यावर वेग मर्यादा फलक नाहीत, अतिक्रमणे, फुटपाथवरील अतिक्रमणाचा वाढता वेडा, बांधकाम परवानगी देताना सार्वजनिक पार्किन्न पालन केले जात नाही, अनधिकृत हातगाडे,नैसर्गिक प्रवाह, ओढेवरील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष,पालिकेचे राखीव जागेमध्ये बांधकाम परवानगी, रस्त्यावरच अनधिकृत मांडव उभारणी,अनधिकृत फ्लेक्स,किमान गरजा,नियमित घंटागाडी नाही, कचरा वर्गीकरण होत नाही,कमी प्रकाशाचे पथदिवे.पाण्याचा अनियमित आणि असमान पुरवठा,रस्ता सफाई नियमित नाही,ट्रैफिक सिग्नल यंत्रणेचा पाठपुरावा नाही,नगरसेवक फिरकत नाहीत, कोणतीही मिटींग घेतली जात नाहीं,,सार्वजनिक पार्किंग व्यवस्था नाही,अन्यमैदान/क्रिडांगण नाहीत,इंटरसिटी बस, रेल्वे स्टेशन बस पाठपुरावा नाही,नागरिकाच्या समस्यांसाठी प्रभागात ऑनलाईन व्यवस्था करता आली नाही रस्त्यावरीलअयोग्य स्पीडब्रेकर्स कडे सपशेल दुर्लक्ष,नगरसेवक,रूग्णालय, पोलीस फोन नंबर लावलेले नाहीत.शहर परिसरात वृक्ष रोपणाचा केवळ देखावा .नगरपालिकेकडे असलेली दुर्लक्षित स्मशानभूमी सातारा नगरपालिका निवडणूक 2025 च्या अनुषंगाने कृपया लक्ष द्यावे.

या समस्यांबाबत या कालावधीत काम न केल्यास नागरीक सेवेत त्रुटी म्हणून आम्ही जबाबदार राहू: असे इच्छुक उमेदवारांनी जाहीर बंधनपत्र लिहून द्यावे. एव्हढीच हतबल मतदार नागरिकांची माफक अपेक्षा सुद्धा द्रविड परिवाराने केलेली आहे. त्यामुळे इतक्या योग्य पद्धतीने निवडणूक होऊन खरोखरच लोकप्रतिनिधी काम करतात का? आणि त्याचा परिणाम सामान्य नागरिक आणि जनतेला सहजपणे उपभोगता येतो का ? असाच प्रश्न हा फलक पाहिल्यावर पुढे येत आहे. एकंदरीतच कोणाचीही भिडभाड न ठेवता अशा पद्धतीने सामान्य मतदाराने लोकप्रतिनिधींना विचारलेले प्रश्न हे खरोखरच लोकप्रतिनिधींना आपल्या कार्याची पोचपावती देणारे असून या प्रश्नांमुळे हे लोकप्रतिनिधी निरुत्तरच होतील असेच मत अनेक सुजाण नागरिक या फलकाकडे पाहून व्यक्त करत आहेत. दरम्यान, या फलकाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सामान्य नागरिक प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवून खर्‍या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आणि या सर्वांची तो प्रश्नांची उत्तरे देणार का असाच प्रश्न एकमेकाला करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!