स्थैर्य, दि.१८: कोरोना काळातील मंदीनंतर बाजारात पुन्हा उत्साह परतत आहे. खरेदीदार दुकानाचा उंबरठा ओलांडू लागले आहेत. व्यवसाय काेराेनाच्या आधीच्या काळातील तुलनेत ६०% पर्यंत गेला आहे. दीपावलीत परिस्थिती आणखी चांगली हाेईल. काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) अंदाजानुसार लाेकांनी गेल्या सात महिन्यांत माेठ्या प्रमाणावर खर्च कपात केली. त्यामुळे देशात लाेकांची अंदाजे दीड लाख काेटी रुपयांची बचत झाली. नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत एका महिन्यात १ लाख काेटी रुपयांची खरेदी हाेईल. यात वाहन, साेने व गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते रिअल इस्टेटमध्ये अंदाजे ३० हजार काेटी रुपयांची खरेदी हाेईल. कॅटच्या मते आतापासून ३१ मार्च २०२१ पर्यंत बाजारात २ लाख काेटी रुपयांचे व्यवहार हाेतील. सात महिन्यांत लाेकांनी गरजेपुरती खरेदी केली; पण दिवाळीच्या माेठ्या सणाला लाेक खरेदी करतील, असे कॅटचे अध्यक्ष बी.सी. भारतीय म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक्स : लाेक घरात, मागणी वाढली : 90 हजार काेटी रु. महसूल मिळेल या वर्षी इलेक्ट्रॉनिकद्वारे
ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष मितेश मोदी म्हणाले, दिवाळीत गत वर्षाच्या तुलनेत टीव्ही, टॅब, मोबाइल इ. वस्तूंची २० ते ३० % जास्त विक्री हाेण्याची शक्यता आहे. काेराेनाचा अंत न झाल्याने येणाऱ्या महिन्यांतही घरात मनोरंजन उपकरणांसह राहावे लागले तर माेठा टीव्ही हवा, असे लाेकांना वाटत आहे.
वस्त्रे : आता सणांत विक्री चांगली हाेणार : 6-6.5 लाख कोटींची आहे वस्त्रांची बाजारपेठ
व्हीमार्टचे सीएमडी ललित अग्रवाल म्हणाले, या संकटाच्या काळातही गेल्या दिवाळीच्या तुलनेत यंदा कपड्यांची विक्री ८०- ९० % हाेईल. दिवाळी खरेदीवर ग्रामीण मानसिकतेचा विशेष परिणाम हाेताे. यंदा शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्याचा शहरी खरेदीवर चांगला परिणाम दिसेल. सरकारच्या एलटीसी व्हाउचर योजनेचाही फायदा हाेईल.
सोने : मागील वर्षाच्या तुलनेत 80% व्यवसाय : 15000 काेटींचे सोने विक्री हाेऊ शकते दिवाळीत
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असाेसिएशनचे एस. के. जिंदल व पृथ्वीराज कोठारी म्हणाले, दिवाळीत सराफा बाजारात उत्साह असेल. यंदा वजनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या दिवाळीला फक्त ७० ते ८० % साेने विक्री हाेईल; पण मूल्यस्वरूपात ती मागील दिवाळीच्या तुलनेत कमी-अधिक असेल. लाेक दागिन्यांएेवजी लगडी व बिस्किटे खरेदी करतील.
ऑनलाइनवर हाेऊ शकताे दुप्पट खर्च
फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडीलसारख्या ई-काॅमर्स साइटवर वार्षिक सणासुदीची विक्री सुरू आहे. रेडशीट सल्लागार संस्थेच्या सप्टेंबरमधील अहवालानुसार, या वर्षी दिवाळीला ५१ हजार काेटी रुपयांपेक्षा अधिक खरेदी हाेईल. ती मागील वर्षातील दिवाळीच्या तुलनेत दुप्पट असेल.