जानेवारी’२२ मधील भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे म्युच्युअल फंड्स

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । मुंबई । म्युच्युअल फंड्स हा प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणूक पर्याय आहे. कोणीही आपल्या गुंतवणूक आवश्यकतांनुसार म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकते. लोक सेवानिवृत्ती, मुलांचे उच्चिशिक्षण, पर्यटन, घर बांधणे आदी गुंतवणूक उद्दिष्टे ठेवून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात. काही जण पोर्टफोलिओत वैविध्य आणण्यासाठी, निवडीचे वैविध्य असलेल्या, म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करतात. जानेवारी महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणा-या म्युच्युअल फंड्सबद्दल सांगताहेत एंजेल वन लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) श्री वैभव अगरवाल.  

कॅनरा रोबेको ब्ल्यूचिप इक्विटी ग्रोथ- लार्ज कॅप फंड:

लार्ज-कॅप फंड्स ब्ल्यू-चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. दीर्घकाळाच्या कक्षेत अन्य इक्विटी फंडांच्या तुलनेत कमी चढउतारांसह, गुंतवणूकदारांना, संपदासंचय करण्यात, हे फंड्स उपयुक्त ठरतात. कॅनरा रोबेको हा एक लार्ज-कॅप फंड आहे आणि ज्यांना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी तो अनुकूल आहे. महागाई दरावर मात करू शकतील असे उत्पन्न हा फंड मिळवून देऊ शकतो.

पराग पारीख फ्लेक्झी कॅप ग्रोथ- फ्लेक्झी कॅप:

पराग पारीख हा फ्लेक्झी कॅप फंड असून, एकाच फंडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आकारमानांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा फंड अनुकूल आहे. याशिवाय, पराग पारीख फ्लेक्झी कॅप योजनेमध्ये परदेशी इक्विटींतही गुंतवणूक केली जाते. फ्लेक्झी कॅप फंडाच्या पोर्टफोलिओतील ३०-३५ टक्के गुंतवणूक परदेशी इक्विटींमध्ये केली जाते. तुम्ही पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी गुंतवणूक करत असाल, तर हा फंड योग्य आहे. फ्लेक्झी-कॅप फंडामध्ये फंड व्यवस्थापनाला सर्व आकारमानांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असते.

कोटक इमर्जिंग इक्विटी ग्रोथ- मिड कॅप:

अधिक चढउतार स्वीकारण्याची तयारी असलेले तसेच दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची तयारी असलेले गुंतवणूकदार मिड-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात, कारण असे फंड्स दीर्घकाळात अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकतात. कोटक इमर्जिंग इक्विटी हा या विभागातील सर्वोत्तम फंड आहे. तुमची सात वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक करण्याची योजना असेल, तर हा फंड अपेक्षित लाभ मिळवून देऊ शकतो. हा फंड मध्यम आकारमानाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.

आयसीआयसीआय प्रु इक्विटी अँड डेट ग्रोथ- बॅलन्स्ड/हायब्रिड:

बॅलन्स्ड फंड्स इक्विटी व डेट अशा दोन्ही उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात. बाजारातील चढउतारांची सवय नसलेल्या नवीन गुंतवणूकदारांसाठी हे फंड्स सर्वांत अनुकूल आहेत. डेट उत्पादनांमधील गुंतवणुकीमुळे मंदीच्या काळातील जोखमीवर मर्यादा येतात. निव्वळ इक्विटी फंडांच्या तुलनेत यामध्ये उत्पन्न मात्र कमी असते. आयसीआयसीआय प्रु इक्विटी अँड डेट हा बॅलन्स्ड फंड आहे. हा पारंपरिक इक्विटी गुंतवणूकदारांसाठी किंवा तीव्र चढउतारांची सवय नसलेल्या नवीन गुंतवणूकदारांसाठी अनुकूल फंड आहे.

एचडीएफसी एस/टी डेट ग्रोथ- डेट:

छोट्या किंवा मध्यम मुदतीसाठी डेट उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेले गुंतवणूकदार डेट फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. यामुळे मुदतठेवींच्या तुलनेत अधिक चांगले करसमायोजित उत्पन्न मिळू शकते. एक ते तीन वर्षासाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी तसेच बँकांतील ठेवींना पर्याय शोधू इच्छिणाऱ्यांसाठी, एचडीएफसी एस/टी डेट हा अनुकूल पर्याय आहे. यात जोखीमही कमी आहे आणि खर्चाचे प्रमाणही कमी आहे. थोडक्यात, म्युच्युअल फंड्स अनेकविध पर्याय देऊ करतात, प्रत्येक व्यक्तीची आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणूक मुदती, जोखीम पत्करण्याची तयारी व रोखतेची आवश्यकता यांची पूर्तता म्युच्युअल फंड्स करतात. तुम्ही वर उल्लेख केलेल्या फंड्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या मुद्दयांचे मूल्यमापन केलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या जवळ जाणारा गुंतवणूक निर्णय करू शकाल.


Back to top button
Don`t copy text!