दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । कोरोना संकट कालावधीत सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री स्वनिधी योजना पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असून लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ सर्व संबंधित यंत्रणांनी पोहोचवावा असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केले.
राज्यस्तरीय बॅंकर समितीची प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसंदर्भात कोकण विभागाची आढावा बैठक हॉटेल सहारा स्टार येथे झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री कराड बोलत होते.
बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, आमदार अॅड. आशिष शेलार, रमेश पाटील व बँक अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड म्हणाले, विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात प्रत्येक राज्यात आढावा बैठका घेण्यात येत आहेत. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पथ विक्रेते, भाज्या विक्रेते, फळे विक्रेते, रस्त्याच्याकडेचे विक्रेते या गरजूंना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. सर्व संबंधित यंत्रणांनी या योजनेचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचवावा. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथे पथविक्रेते, फेरीवाले यांची संख्याही मोठी आहे. त्या सर्व लाभार्थींना योजनेची माहिती देणे, त्यांची नोंदणी करणे यासाठी महानगरपालिका व बॅंकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री. कराड यांनी केले.
किसान क्रेडिट कार्ड व जनधन योजना ही शेतकरी व सर्व सामान्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत असून या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले असल्याचे श्री कराड यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. अशा परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करणाऱ्यांना, फळे व भाज्या विक्रेत्यांना व अन्य छोट्या व्यवसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही योजना सुरू केली, ज्याअंतर्गत या लोकांना पुन्हा काम सुरु करण्यास मदत मिळणार आहे. स्वनिधी योजनेच्या अंतर्गत फुटपाथ वर दुकान लावणाऱ्या स्ट्रीट व्हेंडर्संना आर्थिक मदत केली जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून कॅशबॅक सुविधा प्रदान करून विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित केले जाते. डिजिटल माध्यमाने केलेल्या व्यवहारामुळे विक्रेत्यांच्या क्रेडिट स्कोरमध्येही वाढ होईल. तंत्रज्ञानाचा वापर करून क्षमता वाढविण्याबरोबरच कोरोना संकटातील पंतप्रधान स्वनिधी योजना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय नूतनीकरणासाठी मोलाची ठरणार आहे.