दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा शहराची कचरा मुक्त शहर म्हणून घोषणा झाली असे असताना जुन्याच टेंडरवर शहराची स्वच्छता करणाऱ्या घंटागाड्या पळविल्या जात आहेत हुतात्मा उद्यानात तब्बल दहा गाड्या जाग्यावर उभ्या असून तरीसुद्धा त्या गाड्यांच्या सहाय्यकांचे वेतन परस्पर काढले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे . घंटागाड्यांचे नवीन टेंडर तांत्रिक मंजूरीच्या घोळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अडकले आहे . तिथेही टक्केवारीचा घोळ असल्याने निविदा मंजूरीची फाईल पुढे सरकली नसल्याची चर्चा आहे . ही निविदा तब्बल चौदा कोटीची असल्याची चर्चा असून ती दोन टप्प्यात काढली जाणार आहे . या निविदेसाठी भल्याभल्या ठेकेदारांनी फिल्डिंग लावली असून पालिकेत ला एका मोठा नगरसेवक या टेंडरसाठी सरसावला असल्याची चर्चा आहे .