स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 19 : जगभरात कोरोनानं थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होत असतानाही त्याला म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाही. लॉकडाऊन असल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. अन्नधान्यावाचून हाल झालेल्या 100 कुटुंबांना चक्क भिकाऱ्यानं महिन्याभराचे धान्य पुरवलं आहे. पंजाबच्या पठाणकोटमध्ये असा भिकारी आहे, जो कोरोना योद्धा म्हणून समोर आला आहे. भीक मागून जगणार्या दिव्यांग राजूनेही असेच एक अनोखे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. जे नेहमीच लक्षात राहील. राजूने आतापर्यंत 100 गरीब कुटुंबांना एक महिन्याचे रेशन आणि 3000 मास्क दिले आहेत.
राजू ट्रिसायकलमधून फिरतो आणि दिवसभर भीक मागतो. भीक मागून जमवलेल्या त्याच पैशातून तो लोकांना मदत करतो. राजूने आपल्या भीक मागून जमवलेल्या पैशांतून अनेक गरीब मुलींचं लग्न करून दिलं आहे. राजू म्हणतो की, दिवसभरात जे काही पैसे मिळतात, तो आवश्यकतेनुसार खर्च करतो, उरलेला पैसा जमा करून ठेवतो आणि गरजू लोकांमध्ये त्याचं वाटप करतो. पठाणकोटमधील धनगू रोडवरील रस्त्याकडे जाणारा पूल तुटला होता. ज्यामुळे लोकांना त्रास होत होता. लोकांनी प्रशासनाकडे बर्याचदा तक्रारी केल्या. पण राजूने त्याच्या भीक मागून जमवलेल्या पैशांतून तो पूल दुरुस्त केला. त्याची आता पंजाबमध्ये चर्चा आहे. राजूला त्याच्या स्वतःच्या कुटुंबीयांनीच दूर लोटण्याचं त्याला दुःख आहे. म्हणूनच जर मी काही चांगले कार्य केले, तर कदाचित शेवटच्या क्षणी माझ्या पार्थिवदेहाला खांदा देण्यासाठी तर चार लोक मिळतील. नाहीतर भिकारी जमिनीवर जगतात आणि जमिनीवरच मरतात. त्यांच्या मृतदेहाला कोणी खांदा देणाराही सापडत नाही.