
दैनिक स्थैर्य । 9 एप्रिल 2025। सातारा । सातारा शहराचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेला बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील सुशोभीकरणास सातारा नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे उद्घाटनापूर्वीच उतरती कळा लागली आहे. अनेक मद्यपी या जागेचा वापर मद्यपान करण्यासाठी व झोपण्यासाठी वापर करत आहेत. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे इलेक्ट्रिकचे बल्ब वायरींग सामान चोरी होण्याची तसेच मुलांसाठी खेळण्याची मोडतोड होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सत्यात उतरलेल्या या सुशोभीकरणाच्या प्रकल्पात अबालवृद्धांसाठी वेगवेगळ्या संकल्पना राबविण्यात आल्या. जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळणी उत्तम प्रकाश व्यवस्था कृत्रिम गवत रंगरंगोटी त्याचबरोबर पोलीस चौकीचे सुशोभीकरणाचा समावेश आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस स्वच्छतागृहाचाही समावेश केला गेला आहे. हा प्रकल्प जानेवारी 2025 मध्येच नगर परिषदेकडे हस्तांतर केला असून दोन्ही स्वच्छतागृहाच्या चाव्याही सातारा नगरपरिषदकडे सुपूर्द केल्या आहेत.
सध्या नगर परिषदेकडून या सुशोभीकरणाची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. या जागेचा वापर ढोल, ताशा सराव, वाहन पार्किंग विविध प्रकारचे खेळांचे क्लासेस घेतले जात आहेत. येथील खेळण्याचा लहानांबरोबरच मोठ्या व्यक्तीही बागेतील खेळण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसून येत आहेत. मात्र, दुसरीकडे मद्यपी या जागेचा वापर मद्यपान व झोपण्यासाठी वापर करत आहेत.
या पुलाखालची स्वच्छतागृह बंद असल्यामुळे नागरिक उघड्यावरच लघुशंका करत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना पुलाखालचा प्रवास नकोसा झाला आहे. स्वच्छतागृहाचा वापर नागरिकांना करू द्यावा अशी विनंती येथील नागरिक करत आहेत. स्वच्छतागृह वापरात नसताना देखील स्वच्छ भारत मिशन या समितीस दाखवण्यात आले. समितीची दिशाभूल करून नगरपरिषदेने स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतली.